देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, दुसरीकडे राज्यघटनेच्या चौकटीवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. अशा दुहेरी संकटांशी देशाला सामना करावा लागत आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला लक्ष्य करण्यात येत आहे, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

पुणे - देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून, दुसरीकडे राज्यघटनेच्या चौकटीवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. अशा दुहेरी संकटांशी देशाला सामना करावा लागत आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला लक्ष्य करण्यात येत आहे, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळक-आधुनिक भारताचे शिल्पकार’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘मलेशियातील लीनकॉल्न विद्यापीठा’चे संस्थापक आणि कुलगुरू डॉ. अमिया भौमिक उपस्थित होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. श्री. ग. बापट, कुलगुरू डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी, मास कॉम विभागाच्या प्रमुख डॉ. गीताली टिळक, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक या वेळी उपस्थित होते. 

महाविकास आघाडी करणे शक्य नाही; अजित पवारांची घोषणा

चव्हाण म्हणाले, ‘‘राजकीय घडामोडीत सामूहिक शक्ती आणि माध्यमे यांची महत्त्वाची भूमिका असते, हे लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. आज माध्यमांचे स्वरूप बदलत असले तरीदेखील इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज देशासमोर अनेक आव्हाने उभे आहेत. तरुणांना रोजगार नाही, शेतकरी आत्महत्या, नागरिक सुधारणा कायद्याविरोधात विद्यापीठातील विद्यार्थी, देशभरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत.’’

डॉ. भौमिक म्हणाले, ‘‘लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यांतून त्यागाचा संदेश दिला आहे. त्याची आपल्याला कास धरावी लागणार आहे.’’

डॉ. टिळक म्हणाले, ‘‘देशात भाषेचा वाद सुरू आहे. देशाला एक भाषा असावी, अशी भूमिका लोकमान्यांनी मांडली होती. स्थानिकांना नोकऱ्यांची संधी मिळावी, सर्वांना मोफत शिक्षण मिळावे, अशी त्यांची आग्रहाची भूमिका होती.’’

डॉ. गीताली टिळक यांनी परिषदेची माहिती दिली. इनफ्लिबनेटचे संचालक प्रा. जे. पी. सिंग जुरेल, नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. सुरेंद्र केसी यांनी मनोगत व्यक्त केले. वसुंधरा पळशीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा साठे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The economy of the country was stagnant prithviraj chavan