धोकादायक इमारतीत मुलांना धडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

एकीकडे बालकांच्या सर्वांगीण विकासाचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाचे मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

पुणे - मोडकळीस आलेले पत्र्याचे छप्पर, तुटलेले दार, पाणी आणि साधी वीजसुद्धा नाही, अशा अनेक गैरसोयींचा सामना करीत सध्या आंबेगावमध्ये अंगणवाडीतील बालचमू जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एकीकडे बालकांच्या सर्वांगीण विकासाचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाचे मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेत नवीन समाविष्ट झालेल्या प्रभाग क्र. ४२ मधील आंबेगाव बुद्रुक येथील केंद्र क्र. १८१ मधील अंगणवाडी शाळा क्र. १ व ३ची दुरवस्था झाली आहे. सध्या जिल्हा परिषदेकडेच समाविष्ट भागातील शाळा असून, अद्याप पालिकेकडे त्या वर्ग झालेल्या नाहीत. त्यामुळे या अंगणवाडीचा विकास करायचा कोणी, यावर संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या महापालिका व जिल्हा परिषद याची जबाबदारी घेत नाहीत. यामुळे येथील अंगणवाडीचा विकास रखडलेला आहे.

पावसाचे पाणी मुरून अंगणवाडीची भिंत कमकुवत झाल्याने ती ढासळण्याची शक्‍यता आहे. पावसाळ्यात पत्रे गळतात; तसेच शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शाळेत पाणी, विजेची व्यवस्थाही नाही. मुलांना पिण्यासाठी व शौचालयासाठी पाणीच नसल्याने घरी जावे लागते. विजेअभावी लाइट आणि पंख्यांची सोय नसल्याने उन्हाळ्यात गरम पत्र्याखाली उकाडा सहन करत अंधाऱ्या खोलीत लहान मुले शिकतात. शाळेजवळ अडगळ, कचरा असल्याने त्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मोडक्‍या खिडक्‍यांतून उंदीर, घुशी आत येऊन पोषण आहाराची नासधूस करतात, अशी कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याकडे पालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे,अशी मागणी शंभुरत्न बिग्रेडचे प्रमोद घुले यांनी  केली आहे.

चक्क झेडपी शाळेसाठी विद्यार्थ्यांचे वेटिंग, कुठे आहे ही शाळा?

नवीन समाविष्ट भागातील शाळा अद्याप पालिकेकडे वर्ग  झाल्या नसल्यामुळे बांधकाम दुरुस्तीचे काम करता येणार नाही.
-प्रताप धायगुडे, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

शाळेत अनेक गैरसोयी असून, आमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत.
-फातिमा मुजावर, पालक, आंबेगाव बुद्रुक.

अंगणवाडीची दुरवस्था व मुलांना होणाऱ्या त्रासाबाबत आम्ही निवेदने दिली आहेत; पण त्याची दखल घेतली गेली नाही.
-शालन शेंडे, अंगणवाडी सेविका, आंबेगाव बुद्रुक.

जिल्हा परिषदेकडून पालिकेकडे अंगणवाडीचे हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल.
- दिनेश कोंढरे,  उपसरपंच, आंबेगाव बुद्रुक  

येथील भाग महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे अंगणवाडीच्या विकासाचा प्रश्न आम्हाला सोडवता येत नाही. तरीही दुरवस्थेबाबत प्रत्यक्ष पाहणी करून उचित निर्णय घेऊ.
- दत्तात्रेय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education for children in a dangerous building in ambegaon