
Pune News : समांतर शिक्षण यंत्रणा तयार होण्यावर सरकारचा अंकूश हवा; राजेंद्र पवार
माळेगाव : उद्याचा तरूण आशावादी, ध्यास घेऊन येशस्वी झालेला बनवायचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी ओळखून शिक्षकांनी अध्यापन केले पाहिजे. आपल्याकडे बारावीनंतर वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात.
त्यासाठी कोर्सेस लावावे लागतात. त्या कोर्सची फी पालकांना पेलवत नाही.परिणामी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अपेक्षित शिक्षणापासून वंचित राहतो. त्यासाठी समांतर शिक्षण यंत्रणा तयार होत असताना सरकारने व संबंधित घटकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे आवाहन अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केले.
शारदानगर (ता.बारामती) येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर महत्वपूर्ण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठातून १५६ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.
या चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या भारतीय ज्ञान पद्धतींचा अभ्यासक्रमात समावेश यावर विचार केला गेला. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रमुख राजेंद्र पवार बोलत होते. डॉ. बिना लॉरेन्स,डॉ.बागलकोटी,डॉ.मंजिरी भालेराव,
डॉ.के.सी.मोहिते, डॉ.पंडित विद्यासागर, डॉ.बिना इनामदार, डॉ.एन. एन. सावंत,डॉ.सुजय कुमार नायक, डॉ. श्रीकुमार महामुनी आदींसह महाराष्ट्रासह कन्याकुमारी,तामिळनाडू,कर्नाटक, गोवा,कलकत्ता आदी राज्यातील प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, राजेंद्र पवार यांनी आपल्या शिक्षण पद्धतीत अध्यापनावर जास्त भर आहे, त्यामध्ये बदल करून अध्यापनापेक्षा प्रात्यक्षिक व सराव पद्धतीवर जास्त भर असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फार मोठे,
आमुलाग्र बदल नसून पारंपारिक ज्ञान व आधुनिक ज्ञान या दोन्हीचा समन्वयक साधण्यात आला आहे असे सांगितले. शिक्षणाचा हेतू सांगतडॉ. बागलकोटी म्हणाले, ``आनंदी जीवन हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे. शिक्षणामध्ये मानवी जीवनाचा विचार झाला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यात सर्वच गोष्टी शिकवू शकत नाही. भारतीय शिक्षण पद्धतीत भाषांतर, भेदभाव, दारिद्र्य हे मुख्य आव्हाने आहेत. ‘केसबेस’ लर्निंग झाले पाहिजे.शिक्षणामध्ये संशोधनाला महत्त्व पाहिजे.विद्यार्थ्यांना कमीत-कमी तीन भाषा आल्या तर ते एका भाषेतील माहिती दुसऱ्या भाषेत नेऊ शकतात.``
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथील पुरातत्व विभागाचे प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव यांनी जगातील मानवी संस्कृती कशी उत्पन्न होत गेली, पूर्वीची दळणवळणाची साधने कशी होती, मोहनजोदरो संस्कृती, हडप्पा संस्कृती,ढोलवीरा संस्कृती,
कालीबनग संस्कृती,अक्कडियन संस्कृती,भारतीय संस्कृती इत्यादींची माहिती दिली. तसेच त्यांनी संस्कृतीचा व स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केली. डॉ.के.सी. मोहिते यांनी कौशल्याधारित शिक्षणाला आपल्या अभ्यासक्रमामध्ये महत्त्व दिले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले.
विविध महाविद्यालयांशी सामंज्यस्य करार...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेत शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाने इतर महाविद्यालय व महाविद्यालयातील विभागांशी सामंजस्य करार केले. त्यामध्ये विद्या प्रतिष्ठानचे कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इंदापूर व गोवा राज्यातील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय यांच्याशी करार झाले.
तसेच मानसशास्त्र विभागाने श्री पंचम खेमराज महाविद्यालय-सावंतवाडी (सिंधुदुर्ग) च्या मानसशास्त्र विभागाशी करार केला. भूगोल विभागाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील भूगोल विभागाशीही समन्वय करार केला, अशी माहिती शारदानगरचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी दिली.