लय भारी, कोरोना रुग्णांना खायला अंडी अन् केळी, मनोरंजनासाठी टीव्ही 

विजय जाधव
Saturday, 5 September 2020

सध्या कोरोनाग्रस्तांसाठी बचत गटांच्या माध्यमातून दररोज जेवण दिले जात आहे. परंतु, काही रुग्णांना पथ्य असल्यामुळे अन्न खाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अन्नदान करणाऱ्या इच्छूकांनी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली.

भोर (पुणे) : भोर शहरातील मूकबधीर विद्यालयात प्रशासनाने कोरोनग्रस्तांसाठी सुरु केलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना आणि अलगीकरण केलेल्यांना जेवणाबरोबर आठवड्यातून दोन वेळा उकडलेली अंडी आणि केळी दिली जाणार आहेत. टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानमार्फत अंडी व केळी देण्यात येणार आहेत. तसेच, येथील कोरोना रुग्णांच्या मनोरंजनासाठी चार टीव्ही सेटही बसविण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सध्या कोरोनाग्रस्तांसाठी बचत गटांच्या माध्यमातून दररोज जेवण दिले जात आहे. परंतु, काही रुग्णांना पथ्य असल्यामुळे अन्न खाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अन्नदान करणाऱ्या इच्छूकांनी सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. त्यास प्रतिसाद देत ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांनी मूक-बधीर विद्यालयातील कोरोनाग्रस्तांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व केळी देण्याची तयारी दर्शवली. 

अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड​

दरम्यान, येथील आय टी आय आणि राजगड ज्ञानपीठाच्या गर्ल्स वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये गैरसोयी असल्याच्या तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना केली आहे. दररोज नियमितपणे साफसफाई, गरम पाणी, जेवणातील भाज्यांमध्ये बदल व कर्मचाऱ्यांची ड्युटी यामध्ये योग्य तो बदल केला आहे. मूकबधीर विद्यालयात येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मनोरंजनासाठी चार टीव्ही सेट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना कोरोनाच्या सदस्यस्थितीची आणि आपण घ्यावयाची काळजी याबाबतही अधिक माहिती मिळणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. 

शासनामार्फत कोरोनाग्रस्तांवर योग्य ते उपचार केले जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक मिळू शकणार नाहीत. त्यामुळे काहीं रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येण्याची शक्यता आहे. यासाठी उपचाराअभावी मृत्यू होण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eggs and bananas for corona patients in Bhor city, TV facility for entertainment