आठशे बस खरेदीचे अधिकार आयुक्तांना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीसाठी 800 बस खरेदी करण्यासाठीचे अधिकार संचालक मंडळाने एकमताने पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी दिले. दोन्ही शहरात नव्या बस दाखल होण्यासाठीची प्रक्रिया आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि तत्परतेवर अवलंबून असेल. 

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीसाठी 800 बस खरेदी करण्यासाठीचे अधिकार संचालक मंडळाने एकमताने पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी दिले. दोन्ही शहरात नव्या बस दाखल होण्यासाठीची प्रक्रिया आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि तत्परतेवर अवलंबून असेल. 

पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस समाविष्ट करण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार 200 बस घेण्याची प्रक्रिया दोन्ही महापालिकांच्या स्थायी समितीमार्फत राबविण्यात येत आहे, तर भाडेतत्त्वावरील 550 बस घेण्यासही संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. आता बाजारातून होणाऱ्या वित्तपुरवठ्याद्वारे 800 बस घेण्यासाठी निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीसमोर होता. 

पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे अध्यक्ष अनुक्रमे बाळासाहेब बोडके, ढब्बू आसवानी, संचालक आनंद अलकुंटे आणि कुणाल कुमार बैठकीस उपस्थित होते. 

संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी बस खरेदीसाठी तांत्रिक निविदा उघडण्यात आली. त्यामुळे बस खरेदीचे अधिकार कुणाल कुमार यांना देण्यात आले. महामंडळाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून बस खरेदी करावी, असे या वेळी संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे. या ठरावामुळे बस खरेदीसाठीच्या निविदांना आता संचालक मंडळांची मंजुरी घेण्याची आवश्‍यकता नाही. आयुक्त त्यांच्या अधिकारात बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या ठरावासाठी आयुक्तांना दिलेल्या अधिकारांमुळे पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

"बस खरेदीसाठी प्रशासकीय तत्परता हवी' 

याबाबत महापौर जगताप म्हणाले, ""पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस घ्याव्यात, यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही पाठपुरावा केला होता. त्यासाठीची प्रक्रिया संचालक मंडळाने पूर्ण केली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली असताना, बस लवकरात लवकर याव्यात, यासाठी आता प्रशासकीय तत्परतेची गरज आहे. कुणाल कुमार यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मी करतो.''

Web Title: Eight hundred bus buy the rights commissioners