पुणे जिल्ह्यात ८३० अंगणवाड्या डिजिटल

Digital angawadi in pune district
Digital angawadi in pune district

पुणे -  जिल्ह्यातील अंगणवाड्या आता कात टाकू लागल्या आहेत. पूर्वी जनावरांच्या गोठ्यात, हनुमान मंदिरात किंवा झाडाच्या सावलीत भरणाऱ्या अंगणवाड्यांना हक्काच्या इमारती मिळाल्याच; पण त्याचबरोबर आता तंत्रज्ञानाचाही वापर अंगणवाड्यांमध्ये वाढविण्यास पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने आता डिजिटल अंगणवाड्यांचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. यानुसार आजअखेर जिल्ह्यातील ८३० अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. 

अंगणवाडी डिजिटल व्हावी, यासाठी अंगणवाड्यांना एलईडी टी. व्ही. संच आणि आकार नावाचे लर्निंग सॉफ्टवेअर पुरविले आहे. यासाठी जिल्हा परिषद निधी (झेडपी सेस फंड), विशेष घटक योजना आणि डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी सांगितले. 

जि. प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात अंगणवाड्या आणि मिनी अंगणवाड्या चालविण्यात येतात. पूर्वी यांनाच बालवाड्या म्हटले जात असे; परंतु राज्य सरकारने आता राज्यातील सर्व बालवाड्या पूर्णपणे बंद केल्या असून, पूर्वाश्रमीच्या बालवाड्यांचेच अंगणवाड्यांमध्ये रूपांतर केले आहे. यामध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्रवेश देण्यात येतो. बालकांना हसत-खेळत शिक्षण मिळावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे,असा दुहेरी उद्देश या अंगणवाड्या चालवण्यामागे आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी २१ प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. यामध्ये आंबेगाव, मंचर, बारामती क्रमांक एक व दोन, खेड क्रमांक १ व २, जुन्नर, नारायणगाव, हवेली, उरुळी कांचन, मावळ, मुळशी, पुरंदर, वेल्हे, भोर आणि शिरूर, दौंड व इंदापूर क्रमांक एक व दोन आदी प्रकल्पांचा समावेश आहे. 

तालुकानिहाय डिजिटल अंगणवाड्या 
  आंबेगाव : ६३, बारामती : १००, खेड : ८४, जुन्नर : ६९, शिरूर : ७५, दौंड : ७२, इंदापूर :७२, हवेली : १०४, मावळ : ५१, मुळशी : २९, पुरंदर : ४५, वेल्हे : २५ आणि भोर : ४१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com