esakal | बारामतीत कोरोनाचे थैमान सुरूच, दुकानांबाबत घेतलाय महत्त्वाचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामतीत आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढल्याने बारामती शहर व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. शहरातील व्यवहार रविवारपासून (ता. 2) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.

बारामतीत कोरोनाचे थैमान सुरूच, दुकानांबाबत घेतलाय महत्त्वाचा निर्णय 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : बारामतीत आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढल्याने बारामती शहर व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. काल घेतलेल्या 34 अहवालांमध्ये बारामती शहरातील चार, तर तालुक्यातील चार, असे आठ जण पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, बारामती शहरातील व्यवहार रविवारपासून (ता. 2) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

बारामती शहरातील पाटस रस्ता, फलटण रस्ता, टीसी कॉलेज परिसर, मारवाड पेठेतील रुग्ण, तर तालुक्यातील सावळ, काऱ्हाटी, राजबाग सुपे, गुनवडी येथील रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. आज एकदम आठ जण पॉझिटीव्ह आढळल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान बारामती शहरातील मारवाड पेठेतील व सांगवी येथील महिला, असे दोन मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 14 वर गेली आहे.  शहरातील विविध भागातून कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्या संपर्कातील लोकही पॉझिटीव्ह सापडत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज अखेर बारामती एकूण 139 रुग्ण कोरोनाग्रस्त झालेले असून 68 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 56 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

गावागावांत तयार होणार तळीरामांची यादी

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत आढावा बैठक घेत कोरोनाच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य व इतर यंत्रणांनी काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वेगाने वाढू लागल्याने ही चिंतेची बाब असल्याचे पवार यांनी या बैठकीत नमूद केले. बारामतीत कोणत्याही रुग्णाला बेड मिळाला नाही, असे होता कामा नये, या साठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा असेही अजित पवार म्हणाले. 

बारामती शहरातील व्यवहार रविवारपासून (ता. 2) सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. आज या संदर्भातील निर्णय उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. गेले अनेक दिवस बारामतीतील व्यवहार व दुकानांना दुपारी तीन वाजेपर्यंतची सवलत देण्यात आली होती. मात्र, व्यापाऱ्यांच्या मागणीवरुन ही वेळ संध्याकाळी पाचपर्यंत वाढवण्यात आली आहे. बारामतीतील व्यापा-यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मागितली होती, मात्र शहरातील नियमित वाढणारी रुग्णांची संख्या विचारात घेत प्रशासनाने पाचपर्यंतच व्यवहारांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे नाव मोबाईल नंबर व पत्ता ठेवण्यासह, सॅनेटायझर्सचा वापर, मास्क आणि इतर काळजी घेण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन झाल्यानंतर व्यापा-यांनी आता लॉकडाऊन करु नये अशी भूमिका मांडली होती. व्यवहारांना पूर्ववत परवानगी द्यावी, अशीही त्यांची मागणी होती. त्याचा विचार करुन आज संध्याकाळी पाच र्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली गेली. गेल्या चार महिन्यात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून आगामी काळातील सण विचारात घेता शहरातील बाजारपेठ व जनजीवन पूर्ववत होणे गरजेचे असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले होते. जेथे रुग्ण सापडतात त्या इमारतीसह आजूबाजूच्या दोन इमारती वगळता इतर सर्वांनाच व्यवहाराची परवानगी द्यावी सरसकट रस्ता बंद करु नये, त्यामुळे ग्राहकांची व दुकानदारांचीही गैरसोय होते, या पार्श्वभूमीवर मायक्रो कन्टेन्मेंट झोनची रचना करावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.