बारापैकी आठ जागांवर भाजपचे वर्चस्व

बारापैकी आठ जागांवर भाजपचे वर्चस्व

महापालिका निवडणुकीत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तीन प्रभागातील १२ पैकी आठ जागांवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. यामुळे आमदार जगदीश मुळीक यांचे राजकीय वजन वाढले. माजी आमदार बापू पठारे यांनी चार जागा मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेसची लाज राखली. या भागातून गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे सचिन भगत यांचा पराभव झाला. 

विमाननगर- सोमनाथनगर, प्रभाग क्रमांक ३ मध्ये चारही गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले बापूराव कर्णेगुरुजी सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून महापालिकेत दिसतील. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका उषा कळमकर, विद्यमान नगरसेविकेचे पती आनंद सरवदे यांना मतदारांनी नाकारले आहे. 

सुरवातीच्या दोन फेऱ्यांत राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरस होती, परंतु उर्वरित फेऱ्यांमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांची आघाडी वाढतच गेली. पाचव्या फेरीचा निकाल स्पष्ट झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करण्यास सुरवात केली. या प्रभागातून अनुसूचित जाती (अ) गटातून राहुल भंडारे, नागरिकांचा मागासवर्ग- महिला (ब) गटातून श्‍वेता खोसे, सर्वसाधारण महिला (क) गटातून मुक्ताबाई जगताप, सर्वसाधारण (ड) गटातून बापूराव कर्णेगुरुजी हे विजयी झाले. 

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे अ गट राहुल भंडारे (भाजप) - १२ हजार ८७१, ब गट - श्‍वेता खोसे - १२ हजार ३८९, क गट - मुक्ताबाई जगताप - १२ हजार ८८४, ड गट - बापूराव कर्णेगुरुजी - १३ हजार १०५ मते. 

प्रभाग - ४  खराडी- चंदननगर 
वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळविले आहे. या प्रभागात त्यांच्या पत्नी संजिला पठारे, पुतणे महेंद्र पठारे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. सुमन पठारे या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या, तर भैय्यासाहेब जाधव हे प्रथमच निवडून आले. पठारे यांचे भाचे संतोष भरणे हे शिवसेनेकडून रिंगणात उतरल्याने येथील लढत चर्चेची ठरली होती. प्रत्यक्षात मतमोजणीत ही लढत एकतर्फी झाल्याचे दिसले. पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आघाडीवर राहिले. अ गटातून (अनुसूचित वर्ग) भैय्यासाहेब जाधव यांना १४ हजार २८ मते, ब गटातून (इतर मागासवर्गीय महिला) सुमन पठारे यांना १७ हजार ३४९ मते, क गटातून (सर्वसाधारण महिला) संजिला पठारे यांना १७ हजार १२५ मते, ड गटातून (सर्वसाधारण खुला) महेंद्र पठारे यांना १४ हजार ८९५ मते मिळाली.  

प्रभाग - ५ वडगाव शेरी- कल्याणीनगर 
आमदार जगदीश मुळीक यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांचे बंधू योगेश मुळीक हे विजयी झाले. शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले सचिन भगत यांना या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांना संदीप जऱ्हाड यांनी पराभूत केले. विद्यमान नगरसेविका सुनीता गलांडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी नगरसेवक ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार होत्या, त्यांनीही विजय मिळविला. अ गटातून (मागास वर्ग महिला) विद्यमान नगरसेविका सुनीता गलांडे यांना १४ हजार ७६७ मते, ब गटात (सर्वसाधारण महिला) शीतल शिंदे यांना १२ हजार ५८४ मते, क गटात (सर्व साधारण) विद्यमान नगरसेवक योगेश मुळीक यांना १२ हजार ५८९ मते आणि ड गटात (सर्वसाधारण) संदीप जऱ्हाड यांना १० हजार २३८ मते मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com