एकविरा आईच्या नावानं उदो उदोऽऽ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

लोणावळा - असंख्य कोळी, आगरी भाविकांसह महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला गडावरील एकविरा देवीच्या चैत्री यात्रेत देवीच्या पालखी सोहळ्यात भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान, एकविरा आईच्या नावानं उदो...उदो करीत देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली होती. एकविरा देवीचा पालखी सोहळा सोमवारी मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरणात झाला. 

देवघरमधील काळभैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने एकवीरा देवी यात्रेस रविवारपासून सुरवात झाली. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सायंकाळी एकवीरा देवस्थानाचे अध्यक्ष अनंत तरे व पालखीच्या मानकऱ्यांच्या हस्ते देवीस अभिषेक, महाआरती व विधिवत पूजा करीत साडी-चोळी अर्पण करण्यात आली. पालखीचे पूजन करीत सायंकाळी पालखी सोहळ्यास सुरवात झाली. देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोकणातून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एकविरा देवस्थानाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्ला परिसरात यात्राकाळात दारूबंदी असल्याने पोलिस दलाच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यात येत होती. पोलिस, महसूल, आरोग्य प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रांताधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार जोगेंद्र कट्यारे, पोलिस उपविभागीय अधिकारी डी. डी. शिवथरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संदीप येडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त विलास कुटे, काळुराम देशमुख, विजय देशमुख, पार्वतीबाई पडवळ, वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त नीलिमा येवले आदींनी गडावरील नियोजन केले. 

Web Title: Ekveera devi yatra