...अन् ९० वर्षीय आजींच्या डोळ्यात पाणी आलं; पुण्यात कोरोना तपासणी केंद्राचा माणुसकीशून्य कारभार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elderly_Woman

अतिवृद्ध आजींचे काय? त्यांची चाचणी घरी येऊन घेता येईल का? असं विचारता ते आमच्या हातात नाही. घरी येऊन टेस्ट करत नाहीत. त्यांना तिथंच न्यावं लागेल, अशी असमर्थता या पथकाने व्यक्त केली. त्यानुसार आज घरातील हलती चालती मंडळी स्वतःच्या तपासणीसाठी सकाळीच सणस मैदानात पोहोचली.

...अन् ९० वर्षीय आजींच्या डोळ्यात पाणी आलं; पुण्यात कोरोना तपासणी केंद्राचा माणुसकीशून्य कारभार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : घरातील तरुण मुलगा कोविड पॉझिटीव्ह आल्याने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांची स्वॅब तपासणी करायच्या सूचना मनपाच्या सर्वेक्षण पथकाने नारायण पेठेतील एका कुटुंबाला दिल्या. कुटुंबातील नव्वदीच्या घरातील आजीला घरी येऊन स्वॅब तपासणी करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे कुटुंबीयांनी आजीला रुग्णवाहिका करून शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ च्या सुमारास तेथे नेले. तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने तेथे असलेल्या भल्या मोठ्या रांगेत उभं राहायचा आदेश दिला...अन् आजीबाईंच्या डोळ्यांत पाणी आले! महापालिकेच्या सणस मैदानातील कोविड केंद्रात नागरिकांना अशा प्रकारचा अनुभव येत आहे.

राष्ट्रपुरूषांच्या बदनामीची बालभारतीनं सुपारी घेतलीय काय? संभाजी ब्रिगेडचा सवाल

एका कुटुंबातील तरुण मुलगा कोविडबाधित निघाल्याने घरातील सर्वांची तसेच शेजाऱ्यांची कोविड चाचणी उद्या सणस मैदान येथे जाऊन करा, अशा सूचना १६ जुलै रोजी मनपाच्या कोविड सर्वेक्षण पथकाने दिल्या. अतिवृद्ध आजींचे काय? त्यांची चाचणी घरी येऊन घेता येईल का? असं विचारता ते आमच्या हातात नाही. घरी येऊन टेस्ट करत नाहीत. त्यांना तिथंच न्यावं लागेल, अशी असमर्थता या पथकाने व्यक्त केली. त्यानुसार आज घरातील हलती चालती मंडळी स्वतःच्या तपासणीसाठी सकाळीच सणस मैदानात पोहोचली.

शेवटचा प्रयत्न म्हणून मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून आजींच्या चाचणी घ्यायला काय पर्याय आहे का? याची विचारणा कुटुंबीयांनी केली. त्यांनीही घरी चाचणी शक्य नसल्याची री ओढली. मात्र, चाचणी केंद्रात घेऊन आल्यास प्राधान्याने चाचणी करून देऊ असे आश्वासन  दिले. त्यावर विसंबून कुटुंबाने रुग्णवाहिका ठरवली. आजींना कसेबसे घेऊन त्यांचा मुलगा तेथे गेला .तेव्हा त्यांना वरील अनुभव आला. मुलाने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या सहकार्याने कसेबसे तपासणीचे कागद भरून घेतले. तेथेही हे कर्मचारी येऊन रांग मोडून कागद भरू नका म्हणत दटावून गेले.

ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​

अधिकाऱ्यांना सांगितले असता तुम्हाला रांगेतच यावे लागेल, असे सुनावले. तपासणीसाठी दुसऱ्या मजल्यावर न्यावे लागेल. इथं लिफ्ट नाही. असं कडक शब्दात सांगितलं. जिन्यातून स्ट्रेचर फिरणार नाही. तेथे स्ट्रेचर कसं न्यायचं? या प्रश्नावर तुम्ही इथं आलेच कशाला? तळमजल्यावर तपासायच असेल तर बिबवेवाडी केंद्रात जा. असाही सल्ला या अधिकाऱ्यांनी दिला. या दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावला असता, आत्ता फोन घेऊ शकत नसल्याचा विनम्र उलट मेसेज आला. रुग्णवाहिकेच्या चालकाने आजींना आपण खुर्चीवर बसवून उचलून नेऊ अशी शक्कल लढवली, पण एका महिला अधिकाऱ्याने खुर्ची काही मिळणार नाही, कसं न्यायचं ते तुमचं तुम्ही बघा, अस ऐकवत स्त्री दाक्षिण्याचा आगळा अनुभव दिला.

Video : पुणेकर संकटात, हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, तर उपचार घ्यायचे कुठे?​

कशीबशी खुर्ची मिळवून आजींना पहिल्या मजल्यावर आणलं. तिथे प्रत्यक्ष तपासणीचे काम करणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अगदी उलटा सुखद अनुभव देत आजींची अवस्था जाणली. नुसती जाणली नाही तर त्यांना तपासणीला प्राधान्य दिले. इतकेच नव्हे, तर तपासणीचा निकालही (निगेटिव्ह) किमान वेळात सांगून आजींची सुटका केली. पुन्हा त्यांना खुर्चीत उचलून आणत रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले.

या घटनेतील प्रशासकीय असंवेदनशीलतेचा पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितीने निषेध केला आहे. तसेच वृद्ध, अतिवृद्ध यांच्यासाठी कोविडच्या घरपोच तपासणीची मागणी केली आहे. वृद्ध, अपंग यांच्या सोयीसाठी तपासणीची सोय तळमजल्यावरच करावी. त्यांना तपासणीत तसेच रांगेत प्राधान्य द्यावे, असेही समितीने म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top