फु बाई फु, ताईला निवडू मी अन्‌ तू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - 
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई 
घराबाहेर पडता भीती वाटते बाई, 
भिऊ नका आता, येईल शिवशाही, येईल शिवशाही 
फु बाई फु, फुगडी फु, ताईला निवडू मी अन्‌ तू 

...अशा मंजुळ स्वरातील गाणी आता मतदारांच्या कानावर येत आहेत. या आकर्षक गाण्यांतून मतदारांना साद घालण्याबरोबरच पुण्यातील गंभीर प्रश्नांकडेही उमेदवार लक्ष वेधून घेत आहेत. 

पुणे - 
अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई 
घराबाहेर पडता भीती वाटते बाई, 
भिऊ नका आता, येईल शिवशाही, येईल शिवशाही 
फु बाई फु, फुगडी फु, ताईला निवडू मी अन्‌ तू 

...अशा मंजुळ स्वरातील गाणी आता मतदारांच्या कानावर येत आहेत. या आकर्षक गाण्यांतून मतदारांना साद घालण्याबरोबरच पुण्यातील गंभीर प्रश्नांकडेही उमेदवार लक्ष वेधून घेत आहेत. 

महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागा-प्रभागांतील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचारफेरी खऱ्या अर्थाने रंगण्यास सुरवात झाली आहे. यात सर्वच पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. प्रचारफेरी निघण्याआधी वातावरणनिर्मिती करण्यासाठी पक्षाची आणि उमेदवारांवर लिहिलेली गाणी प्रभागात वाजवून मतदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. विशेष म्हणजे, स्त्रियांची सुरक्षा, मंगळसूत्र चोरी, कचरा, वाहतूक कोंडी, खड्डे या समस्यांना कौशल्याने गाण्यात हाताळले गेल्याचेही दिसत आहे. 

"भल्या भल्याची झाली असेल आग, कारण मैदानात उतरलाय आता मनसेचा वाघ', "तुमच्या राजाला साथ द्या...' अशी गाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने; तर "आशांये खिली दिल की' अशी गाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून लावली जात आहेत. कॉंग्रेसने "जय हो' हे गाणे कायम ठेवले आहे. "टीक टीक वाजते...' या गीताचे रिमिक्‍स करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने "घेऊन आलो, गोष्ट प्रगतीची खरीखुरी, ऐकून घ्या ध्यान देऊनी, जाऊन सांगा घरोघरी' असे आवाहन केले आहे. "संकटांना रोखण्या ताठ आपुला कणा, दुश्‍मना जिंकण्या, झुंज देऊ पुन्हा' असे गीत शिवसेनेच्या प्रचारफेरीत ऐकायला मिळत आहे. गाण्याच्या शेवटी मात्र "मला मत देऊन बदल घडवा' हे वाक्‍य न विसरता सर्वच उमेदवार मतदारांना सांगत आहेत. 

सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही स्वत:वर आणि पक्षावर आधारित आकर्षक, नावीन्यपूर्ण गाणी बनवून घेण्यावर भर देत आहेत. ही गाणी एक ते पाच मिनिटांपर्यंतची आहेत. ती प्रचारावेळी लावली जातात. शिवाय, सोशल मीडियावरही एकमेकांना पाठवली जातात. 
- ओंकार केळकर, स्टुडिओ प्रमुख 

Web Title: Election Campaign Song