
Baramati : बारामती तालुका सहकारी दूध संघाची निवडणूक बिनविरोध; अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध
माळेगाव - बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या पंचावार्षिक निवडणूकीच्या अनुषंगाने १९ जागांसाठी १९ संस्था प्रतिनिधींनीच आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केल्याचे अधिकारी सुधीर खंबायत यांनी आज जाहिर केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवारी शेवटचा दिवस होता. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल केलेले १९ उमेदवार हे राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विचाराचे आहेत. परिणामी बारामती दूध संघाची निवडणूक परंपरेनुसार यंदाही बिनविरोध झाली आहे. या प्राप्त स्थितीमुळे अजित पवार यांचे या संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शुक्रवारी पवार यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रावादी पार्टीची १९ जणांची अधिकृत उमेदवार यादी प्रसिद्ध केली. त्या यादीमध्ये बारामती दूध संघाचे मावळते अध्यक्ष संदीप हनुमंत जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रेय रायकर यांच्यासह संचालक संजय रामचंद्र कोकरे, सतिश हरिश्चंद्र पिसाळ, संजय ज्ञानदेव देवकाते यांना पुन्हा संधी मिळाल्याचे दिसून आले.
सर्वसाधारण मतदार संघासाठी १४ जागा आहेत. त्यामध्ये संदीप हनुमंत जगताप (कुरणेवाडी), संजय तुकाराम शेळके (काटेवाडी), प्रशांत दत्तात्रेय खलाटे (लाटे), श्रीपती शंकर जाधव (डोर्लेवाडी), संतोष मारूती शिंदे (मुर्टी), दत्तात्रेय सदाशिव वावगे (सोनवडी सुपे) , शहाजी जिजाबा गावडे (मळद), पोपट सोमनाथ गावडे (कऱ्हावागज), संजय रामचंद्र कोकरे (पणदरे) , सतिश हरिश्चंद्र पिसाळ (फोंडवाडा), बापुराव तुकाराम गवळी (उंडवडी सुपे), नितीन विश्वास जगताप (वाकी), किशोर भगवान फडतरे (सिद्धेश्वर निंबोडी), संजय ज्ञानदेव देवकाते (नीरावागज) यांचा उमेदवारीमध्ये समावेश आहे.
अनुसूचित जाती-जमातीप्रतिनिधीसाठी १ जागा असून येथे सुशांत महादेव जगताप यांनी संधी दिली. महिला प्रतिनिधीसाठी २ जागा असून यंदा स्वाती मोहन खामगळ (ढाकाळे), शोभा गोरख जगताप (वडगाव निंबाळक) यांचा समावेश आहे. इतर मागास वर्गीय प्रतिनिधीसाठी १ जागा असून राजेंद्र दत्तात्रेय रायकर (काऱ्हाटी) यांची वर्णी लागली आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी १ जागेवर पुरूषोत्तम शिवाजी गाढवे (आंबी खुर्द) यांचे एकमेव नाव उमेदवार यादीमध्ये पुढे आले.
दरम्यान, अजित पवार सर्वेसर्वा असलेल्या बारामती दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगूल २७ मे रोजी वाजला होता. सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची ही निवडणूक होती. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून बारामती दूध संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याची नोंद आहे. बिनविरोधची परंपरा चालू निवडणूकीमध्येही दिसून आली.यंदाच्या निवडणूकीसाठी अधिकृतरित्या १९३ मतदार संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार होते.
सहकार, विकास आणि त्यातून शेतकऱ्यांची समृद्धी बारामती दूध संघाने साध्य करण्याचा आज प्रय़त्न केला आहे. त्याकामी विरोधी पक्षनेते अजितदादा आणि आजीमाजी संचालक मंडळासह अधिकारी, कामगारांचे योगदान महत्वपुर्ण ठरते. त्यामुळे खऱ्याअर्थाने इच्छुक उमेदवार अजितदादांचे नेतृत्व मान्य करतात आणि संघाची निवडणूक परंपरेनुसार बिनविरोध होते, असे मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले.