Yashwant Sugar Factory Election : यशवंत साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध होणार ?

यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असून यासंदर्भात बुधवारी (ता. १३) लोणी काळभोर येथील गुलमोहर लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठक झाली.
election of yashwant sugar factory will uncontested loni kalbhor pune
election of yashwant sugar factory will uncontested loni kalbhor puneSakal

उरुळी कांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असून यासंदर्भात बुधवारी (ता. १३) लोणी काळभोर येथील गुलमोहर लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीस हवेली तालुक्यातील कारखान्याचे माजी संचालक व सभासद वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निवडावयाच्या जेष्ठ मंडळींच्या कोअर कमिटीतील सदस्यांवरून गदारोळ झाल्याने निवडणूक बिनविरोध होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अण्णासाहेब मगर यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. महाराष्ट्रात नंबर एक राहिलेला यशवंत सहकारी साखर कारखाना तेरा वर्षांपूर्वी बंद पडला. त्यानंतर आता कारखान्याची निवडणूक होत आहे.

या पार्श्वभूमीवर गुलमोहर लॉन्स येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या कारखान्याच्या जीवावर अनेक दिग्गजांनी आपली राजकारणाची पोळी भाजली; परंतु गेल्या १२-१३ वर्षात कारखाना बंद झाल्यापासून कारखान्याकडे ढूंकूनही बघायला या मंडळींना वेळ नव्हता.

तसेच अण्णा साहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासही ही मंडळी कधी कारखाना कार्यस्थळावर आली नाही. त्याचा रोष सभासदांच्या मनात असून कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर ही मंडळी, मात्र एकत्रित आल्याची भावना अनेक सभासदांनी व्यक्त केली. या कारखान्यासाठी कोणीही शासनाकडून मदत आणू शकले नाही.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अनेक दिग्गज नेते कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पीडीसीसी बँकेवर असतानाही कारखान्याची २४८ एकर जमीन असतानाही कारखान्यासाठी कर्ज आणण्यास असमर्थ ठरले आहेत. याचा रोष सभासदांकडून व्यक्त केला जात आहे.

हवेलीचे ज्येष्ठ नेते कारखान्याचे माजी संचालक प्रताप गायकवाड म्हणाले, "ज्येष्ठ नेत्यांनी पोटात एक आणि ओठात एक, अशी अवस्था न ठेवता जे काय आहे ते खरं खरं बोलून एक नवीन दिशा द्यावी व कारखाना बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावा." तर जितेंद्र बडेकर म्हणाले, "आम्ही सर्व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी फॉर्म भरलेले एकत्रित बसून आमचा एकच माणूस निवडणुकीसाठी देऊ."

मी एक सर्व सामान्य कामगाराचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य काम केले पण माझे वडील कारखाना बंद झाल्यावर मानसिक त्रास घेऊन या जगाचा निरोप घेतला. माझ्या वडिलांना श्रद्धांजली म्हणून मी उमेदवारी अर्ज भरला पण मी सर्व सभासद व मार्गदर्शन करणारे सर्व जेष्ठ यांना विनंती करतो कारखाना चालू झाला तर कामगारांच्या वारसाचा विचार करण्यात यावा व कोणत्याही माजी संचालक व त्यांच्या वारसाचे फॉर्म पहिले विड्रॉल करण्यात यावे ही विनंती नीलेश काळभोर यांनी केली आहे.

कारखान्याचे माजी संचालक राजू पाटील घुले यांनी आकडेवारीनुसार कारखान्याचे पुढील दिशा कशी असेल, हे सांगून कारखाना बिनविरोध करण्यासाठी कसा प्रयत्न करावा लागेल व कारखाना काटकसरीने कसा चालवावा लागेल पॅकेज कसे मिळवावे, याचे मार्गदर्शन केले. लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी कारखान्याची जमीन एक इंच न विकता कारखाना कसा चालू करणार याबाबत ज्येष्ठांनी जाहीर करावे, अशी मागणी केली.

दरम्यान, जेष्ठ मंडळींची एक कोअर कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कोअर कमिटीच्या सदस्यांवरून बैठकीत काहीसा गदारोळ झाला. शेवटी वरिष्ठांनी कोर कमिटी दोन दिवसात कळविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. यावेळी अनेक माजी संचालकांनी आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केली तर काहींनी जेष्ठ आणि तरुणांना एकत्रित करून पॅनल तयार करावे, अशी मागणी केली. एकंदरीतच बिनविरोधचा सूर निघाला खरा परंतु शेवटी कोर कमिटीवरून गोंधळ झाला, त्यामुळे बिनविरोध होणार का याबाबत शंका व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com