Election Results : विजयानंतरही बारामती सुनी सुनी

NCP
NCP

बारामती - निवडणूक लोकसभा असो की विधानसभेची, बारामतीत निवडणूक हा उत्सवाचा भाग होती. आताही बारामती राष्ट्रवादी काँग्रेसनेच जिंकली आहे. गतवेळेपेक्षाही अधिक मताधिक्‍य घेतले असले तरी मावळमधील पराभव आणि अपेक्षेपेक्षा कमी जागांवर मिळालेला विजय हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की, आज बारामती दिवसभर सुनी सुनी होती.

बारामतीत गुरुवारी (ता. २३) राष्ट्रवादीने नेहमीप्रमाणे जल्लोष केला नाही. सकाळपासून असलेले वातावरण संध्याकाळपर्यंत कायम होते. सुप्रिया सुळे यांचा विजय राष्ट्रवादीला अपेक्षितच होता. अर्थात या विजयाला आणखी एक आनंदाची किनार होती, ती म्हणजे बारामतीत राज्य, देशातील नेत्यांनी तळ ठोकून बारामती जिंकायचीच, हा पण केला होता; त्या सर्व दिग्गज नेत्यांना बारामतीकर भुलले नाहीत, उलट गतवेळेपेक्षा दुप्पट मताधिक्‍याने सुळे यांना विजयी केले. तरीही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या नजरा मावळवर अधिक होत्या. या ठिकाणी प्रवाहाच्या विरोधात जाऊन माढ्यासारखा प्रयोग यशस्वी करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली होती. बारामती तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन पार्थ पवार यांचा प्रचारही केला होता. तेथे पार्थ यांना नक्की यश मिळेल, अशी कार्यकर्त्यांची धारणा होती. तेथे यश न मिळाल्याने पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले होते.  

एकीकडे देशभरात भाजपने विक्रमी यश मिळवूनही बारामतीत केलेला संकल्प पूर्ण होऊ न शकल्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने मागील वेळेपेक्षा अधिक आघाडी घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीही शांत राहणेच पसंत केले. एकूणच राज्याच्या इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये जल्लोषाचे वातावरण असले तरी बारामती मात्र त्याला अपवाद राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com