निवडणुकीमुळे दिवाळीची सुटी लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

शिक्षक वैतागले
एरवी ही सुटी दिवाळी सुरू होण्यापूर्वी चार-पाच दिवस आधीच सुरू होते. त्यामुळे घरच्या साफसफाईपासून ते फराळ, खरेदी अशा दिवाळीशी संबंधित कामासाठी वेळ मिळतो. पण, या वर्षी दिवाळीच्या आदल्या पाच दिवसांपर्यंत शाळा सुरू असल्याने शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजाबरोबरच विद्यार्थ्यांचा निकालही तयार करण्याची जबाबदारी असल्याने शिक्षक वैतागले आहेत.

शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर परिणाम; यंदा १३ दिवस शाळा बंद
पिंपरी - विधानसभा निवडणुकीचा परिणाम शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर झाला आहे. तसेच शिक्षकांच्या दिवाळीच्या सुटीवरही गदा आली आहे. मतदानाची तारीख २१ ऑक्‍टोबर असल्याने शिक्षक २२ ऑक्‍टोबरपर्यंत निवडणूक कामात व्यग्र असतील. त्यामुळे यंदा दिवाळीची सुटी २१ ऐवजी २३ ऑक्‍टोबरपासून लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सुमारे २० दिवस असलेली दिवाळीची सुटी यंदा तेरा दिवसच मिळणार आहे. त्यामुळे महिला शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

२१ ऑक्‍टोबरपासून शाळांना सुटी देण्यात यावी, असा आदेश शिक्षण संचालनालयाने १२ एप्रिल २०१९ रोजी पत्राद्वारे काढला होता. मात्र, निवडणुकांमुळे २१ ऑक्‍टोबर रोजी सुटी देता येणार नाही, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे २१ व २२ ऑक्‍टोबर रोजी सुटी दिल्यास दिवाळीची सुटी घेता येणार नाही. त्यामुळे सुटी २३ व २४ ऑक्‍टोबरनंतर देण्याची शिक्षकांची मागणी होती. अंशतः बदल करून ही सुटी २३ ऑक्‍टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत लागू केली असून, ५ नोव्हेंबर रोजी शाळा नियमित सुरू होतील, अशी माहिती मोरे यांनी दिली. काही शाळांनी वेगवेगळ्या कारणांनी सुट्या कापून घेणे, राष्ट्रीय सणांच्या सुट्या नाकारणे, साप्ताहिक सुटीच्या दिवशी कामावर बोलावणे, असे प्रकार सुरू केले असल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election School Diwali Holiday