उमेदवारांच्या खिशावर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून काम करावे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत.
 -डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

पुणे - मतांसाठी मतदारांना कोणी पैशांचे आमिष दाखवीत असाल तर सावधान. कारण प्रत्येक उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर आहे. निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्चाबाबत आयोजित विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत मुरलीकुमार यांनी या सूचना दिल्या. सर्व विभागांनी निवडणूक कामकाज काटेकोर करावे. दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावी, असेही त्यांनी बजावले. बैठकीत भरारी पथकांसह संबंधित अन्य पथकांनी आतापर्यंत आचारसंहिता अंमलबजावणी आणि निवडणूक खर्चविषयक तक्रारींबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी घेतला. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरण्यात येणारा पैसा आणि अवैध मद्य विक्रीवर आळा घालावा. पथकांनी संशयित वाहनांची तपासणी करून अवैध वाहतूक होत असलेली रोकड, मद्य आणि मादक पदार्थ जप्त करून कारवाई करावी. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि बेकायदा पैशांचा वापर याची काटेकोर तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध विभागांची माहिती दिली. 

निवडणूक निरीक्षक चंदरशेखर, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, ‘सी-व्हिजिल’चे समन्वय अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, माहिती उपसंचालक मोहन राठोड या वेळी उपस्थित होते.

पोलिसांची गुन्हेगारांवर
विधानसभा निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार, तडीपार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत दोन हजार ७०० सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

पाच वर्षांतील सराईत गुन्हेगार, रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे सदस्य, त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, घरफोडी, जबरी चोरी, यापूर्वीचे तडीपार, झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केलेले (एमपीडीए), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई झालेल्या गुन्हेगारांची चौकशी सुरू आहे. तसेच, जामिनावर सुटणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेवले जात आहे. अमली पदार्थविरोधी पथक, खंडणीविरोधी पथकांकडूनही गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, निवडणुकीच्या कालावधीमध्ये शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही काही महिन्यांपूर्वीच कारवाई सुरू केली होती. त्यानुसार २७०० गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्यांना बोलावून त्यांची चौकशी केली आहे.
- बच्चन सिंह, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election system watch on candidate police criminal