esakal | सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका अखेर जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका अखेर जाहीर

सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका अखेर जाहीर

sakal_logo
By
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे: राज्यातील अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याबाबत सहकार विभागाने अखेर गुरुवारी (ता. १६) आदेश जारी केले. गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीची ही प्रक्रिया तत्काळ सुरू होणार आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका अखेर मार्गी लागणार आहेत.

हेही वाचा: पुणे: बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे

अडीचशे किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीवर सोपविण्यात आली आहे. ज्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे, अशा सोसायट्यांच्या निवडणुका तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही सुरू करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर केल्या. परंतु प्राधिकरणाच्या अखत्यारीत नसल्यामुळे अडीचशेपेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुकीबाबत निर्णय झाला नव्हता. राज्यात एकूण सोसायट्यांच्या तुलनेत अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या जवळपास ९० टक्के आहे.

कालावधी संपूनही सोसायट्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका न झाल्यामुळे बहुतांश पदाधिकारीही त्रासले होते. त्यामुळे अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सभासदांकडून करण्यात येत होती.

कोरोनाचा प्रादुभार्वामुळे निवडणुका लांबल्या

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी पुढे ढकलल्या होत्या. १८ मार्च २०२०, १७ जून २०२० आणि २८ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत निवडणूक पुढे ढकलली होती. तसेच, १६ जानेवारी २०२१, २४ फेब्रुवारी आणि सहा एप्रिलच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सोसायट्यांचे लक्ष लागून होते.

"राज्य सरकारच्या निर्णयामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या स्तरावरच निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणूक कशी घ्यावी, त्याच्या नियमावलीबाबत सोसायट्यांना गृहनिर्माण संस्था फेडरेशनकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे."- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशन,

loading image
go to top