esakal | राज्यात ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्याने होणार विद्युत निरीक्षण

बोलून बातमी शोधा

Electricla Inspection

राज्यात ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्याने होणार विद्युत निरीक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्या-मुंबईसह राज्यात ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अशा घटना घडू नयेत, यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचे व उद्‌वाहनाचे (लिफ्ट) निरीक्षण (इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन) करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत उपकरणांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या असून, यात जीवित व वित्तहानी झाली आहे. तसेच कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील खासगी व सार्वजनिक रुग्णालयांवर ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी विजेचे अपघात व आग लागण्याची घटना घडू शकते. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक व खासगी रुग्णालयातील विद्युत यंत्रणेचे निरीक्षण करून त्याबाबतचे अभिप्रायासह अहवाल संबंधित आस्थापनेस कळवून त्याचे निराकरण केल्यास विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणे शक्य होईल. तसेच सदर ठिकाणाच्या उदवाहनाचे निरीक्षण करणेही आवश्यक राहणार आहे, या उद्देशाने हे तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा: बहुरुप्यांचा जगण्यासाठी संघर्ष

निरीक्षण करताना खासगी रुग्णालयासाठी रुग्णालयाचे नोडल अधिकारी म्हणून नागरी स्वराज्य संस्थांचे अधिकारी अथवा स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी यांची नियुक्ती व सरकारी रुग्णालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत शाखेचे अधिकारी यांचे साह्य घेणार आहेत.

अशी केली आहे तयारी

  • राज्यातील सार्वजनिक व खासगी रुग्णालयातील विद्युत संच मांडण्याचे निरीक्षण

  • त्यासाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला देणार

  • तपासणी सूची तयार करून त्यानुसार तातडीने सर्व रुग्णालयातील विद्युत मांडण्याचे निरीक्षण

  • सदर निरीक्षणांचे अहवाल अभिप्राय व त्रुटीसह संबंधित रुग्णालयांना कळवून त्याची पूर्तता करणार

  • त्याची जबाबदारी ही मुख्य विद्युत निरीक्षकांवर

  • कार्यवाहीचा अहवाल सरकारला सादर होणार