नवले रुग्णालयाचा वीजपुरवठा  बिल थकल्याने खंडित 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - नऱ्हे येथील श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाने वीजबिलाची थकबाकी न भरल्यामुळे महावितरण कंपनीने मंगळवारी दुपारी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे जनरेटरचा वापर करून रुग्णसेवा सुरू ठेवण्याची वेळ रुग्णालयावर आली. अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा एक हजार खाटांच्या रुग्णालयात रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वीजपुरवठा बंद केल्याची माहिती पुढे आली आहे. 

याबाबत श्रीमती काशिबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. अरविंद भोरे म्हणाले, ""देशातील वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत असताना नवले रुग्णालयात गेली दहा वर्षे रुग्णांवर संपूर्ण मोफत उपचार केले जात आहेत. तसेच, आजही केवळ नाममात्र शुल्क घेऊन उपचार केले जातात. त्यासाठी अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो. या पार्श्‍वभूमिवर वीजपुरवठा खंडित करण्याची घटना घडली आहे. पण, त्यानंतरही रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने उपचार करता येणार नाहीत, हे कारण देऊन एकाही रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवले नाही. सर्व रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांची तितक्‍याच चांगल्या प्रकारे शुश्रूषा केली जात आहे. रुग्णसेवा खंडित होऊ नये, यासाठी आणखी एक जनरेटर भाडेतत्त्वावर आणणार आहे.'' 

दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे म्हणाले, ""रुग्णालयाला थकबाकी भरण्यासाठी वेळोवेळी संधी दिली होती. त्याबाबत पुरेसा अवधी दिला होता. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी पंधरा दिवसांची नोटीसही रुग्णालय प्रशासनाला बजावली होती. त्यानंतरही थकीत बिल न भरल्यामुळे पूर्वसूचना देऊन रुग्णालयाचा वीजपुरवठा मंगळवारी दुपारी खंडित केला.'' 

रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याची कोणतीच माहिती कळली नाही. संध्याकाळी जनरेटरवर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्या वेळी या घटनेची माहिती झाली. पण, त्यानंतरही रुग्णसेवा नियमित सुरू आहे. ठरलेल्या वेळी डॉक्‍टर रुग्णांना तपासत आहेत. रुग्णाला औषधे दिली जात आहेत. 
- संतोष काशीद, रुग्णाचे नातेवाईक 

Web Title: electricity cut of Navale hospital due to bills