वाकडकर अंधारात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

सोसायट्यांना फटका
गेल्या दोन महिन्यांपासून सोसायट्यांना जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे डिझेलवर होणारा खर्च वाढला असल्याचे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे. वीजपुरवठा खंडित होण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. सर्वाधिक फटका पिंक सिटी रोड, शिवाजी चौक ते पिझ्झा हट, प्रीस्टिन प्रो-लाइफ आदी परिसरातील नागरिकांना बसत आहे. आठ दिवसांपूर्वी यमुनानगर भागात केबल तुटली होती. येथील वीजपुरवठा सुमारे ३६ तास खंडित होता. आता शाळेजवळील केबल सुमारे पाच ठिकाणी तुटली आहे. बारा तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पिंपरी - वाकड परिसरात महापालिकेच्या ठेकेदारातर्फे विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र, जेसीबीच्या साह्याने खोदकाम करताना काळजी घेतली जात नाही. त्यामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटत असून, वाकडकरांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वाकड परिसराचा झपाट्याने कायापालट झाला आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. येथील आयटीयन्सची संख्या लक्षणीय आहे. दिवसरात्र त्यांची कामे सुरू असतात. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. खंडित वीजपुरवठ्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महापालिकेकडून ठेकेदारातर्फे सुरू असलेल्या कामांसाठी केलेले खोदकाम त्याला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. 

वाकड परिसरात अनेक ठिकाणी पावसाळी गटार व सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात आहे. त्यामुळे अनेक वीजवाहिन्यांसह इंटरनेट व अन्य सेवावाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे विजेसह अन्य सेवाही विस्कळित होत आहे. तुटलेली केबल दुरुस्त केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी तुटून ती खंडित होत असल्याने महावितरणचे कर्मचारी, अधिकारीही त्रस्त झाले आहेत. 

दररोज किमान वीसहन अधिक सोसायट्यांची वीज गायब होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी वाकड स्मशानभूमीत चक्क मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात अंत्यविधी करावे लागले. याबाबत विक्रम विनोदे यांनी वाकडमध्ये जन्म झाल्याबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘माझ्या चुलत्यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. वीज नव्हती. रस्ते खोदलेले होते. त्यामुळे मोठी गैरसोय झाली. चिखलातून वाट काढत स्मशानभूमीपर्यंत पोचलो आणि मोटारीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागले. ही एक प्रकारे मृतदेहाची विटंबना आहे. वाकडमध्ये जन्माला आल्याची मला खंत वाटते.’’

याबाबत महावितरणचे सहायक अभियंता सनी टोपे म्हणाले, ‘‘मनुष्यबळ कमी असतानाही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. परंतु, अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्याने भूमिगत वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.’’ 

वीजपुरवठा खंडित होण्यामागे सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून खोदकाम करायला हवे होते. त्यामुळे विजेची समस्या निर्माण झाली नसती. नागरिकांना त्रास झाला 
नसता. 
- किरण वडगामा, अध्यक्ष, पलास सोसायटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Line Break Darkness Wakad

टॅग्स