प्रयोगातून वीजबचतीची ‘स्वप्नपूर्ती’

निगडी - स्वप्नपूर्ती सोसायटीचा सौरऊर्जा प्रकल्प.
निगडी - स्वप्नपूर्ती सोसायटीचा सौरऊर्जा प्रकल्प.

पिंपरी - सौरऊर्जेचा वापर, अतिरिक्त सौरऊर्जेचे महावितरणला वितरण, ट्युबलाइटऐवजी एलइडी दिव्यांचा आठ वर्षांपासून प्रभावी वापर, भूमिगत टाक्‍यांमधून पाणी उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपांच्या माध्यमातून विजेचा कमी वापर अशा विविध उपाययोजना करून निगडीतील स्वप्नपूर्ती सोसायटीने (फेज १) ऊर्जा बचतीचा आदर्श अन्य गृहनिर्माण सोसायट्यांसमोर ठेवला आहे. ऊर्जा बचतीसाठी राज्य ऊर्जा विकास अभिकरणाने (महाऊर्जा) घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्वप्नपूर्ती सोसायटीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

‘महाऊर्जा’ने राज्यस्तरावर ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात निगडीतील स्वप्नपूर्ती फेज-१ सहकारी गृहरचना संस्थेने सहभाग घेतला होता. सोसायटीचा परिसर सुमारे अडीच एकरचा असून, आठ इमारती व २९० सदनिका आहेत. पूर्वी सोसायटीने रात्रीच्या प्रकाशासाठी ट्युबलाइटचा वापर केला होता. पाणीउपसा करण्यासाठी आठ विद्युत पंप होते. त्यामुळे दरमहा सोसायटीचे वीजबिल ५० हजारांवर येत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोसायटीने प्रतिदिन ४० किलोवॉट सौरउर्जा निर्मिती करणारे संयंत्र बसवले. त्यातून मिळणाऱ्या उर्जेचा वापर सुरू केला.

इमारतींमधील ट्युबलाइट काढून २०१२ पासून एलईडी दिव्यांचा वापर सुरू केला. इमारतीच्या छतावरील टाक्‍यांमध्ये पाणी पोचण्यासाठी लावलेल्या पंपांची संख्या कमी केली. सौरऊर्जेचा वापर सुरू केल्याने ‘महावितरण’कडून वीजपुरवठा घेण्याची वेळ आली नाही. त्यामुळे वीजबिलावर होणारा मोठा खर्च वाचला आहे. वीज बचतीबाबत स्वप्नपूर्ती सोसायटीला यापूर्वी राज्य सरकारचा सहकारनिष्ठ व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा सहकार पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. आता ‘महाऊर्जा’चा पुरस्कार मिळाला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पावसाचे पाणी बोअरवेलमध्ये साठवतो. कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जात आहे, असे उपक्रम सोसायटी राबवित असल्याचे सोसायटीचे विदुला दैठणकर, कांतिलाल उमाप यांनी सांगितले.

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा अर्थात सौरऊर्जेचा प्रभावी वापर करून आम्ही वीजबचत केली आहे. दिवसा निर्माण झालेली सौरऊर्जा ‘महावितरण’ला दिली जात आहे. त्याबदल्यात रात्री ‘महावितरण’कडून वीज घेतली जात असल्याने वीजबिलावर खर्च होत नाही. सर्व सदस्य व संचालक मंडळाच्या सक्रिय पाठिंब्यामुळे सोसायटीने वेगवेगळे पुरस्कार मिळविले आहेत.
- रवींद्र हिंगे, अध्यक्ष, स्वप्नपूर्ती सोसायटी फेज १, निगडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com