विजेच्या धक्‍क्‍याने बालकाचे हातपाय निकामी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

घरावरून गेलेल्या उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने बालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तपास केल्यानंतर घरमालक व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे.

पुणे  - घराच्या छतावर खेळणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालकाला टेरेसजवळील महावितरणच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का बसला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्षे) या बालकावर आपले हातपाय गमाविण्याची वेळ आली. ही घटना १८ एप्रिल रोजी कात्रज परिसरात घडली. याप्रकरणी आदीच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी घरमालक मनोज सोडमिसे व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

गणेश गायकवाड (वय २९, रा. आंबेडकर चौक, बोपोडी, औंध) हे कपडे शिवण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे काका कात्रज येथील सच्चाईमाता नगर परिसरातील सोडमिसे यांच्या घरामध्ये भाड्याने राहण्यास होते. मागील एप्रिल महिन्यात १८ तारखेला गायकवाड, त्यांची पत्नी व मुलगा आदी असे तिघे जण काकांना भेटण्यासाठी सच्चाईनगर येथे गेले होते. सायंकाळी आदी खेळता-खेळता छतावर गेला. सोडमिसे यांच्या या घरालगतच विजेचे रोहित्र बसविले असून, त्याची वीजवाहिनी त्यांच्या घरावरून गेली आहे. खेळताना आदी याच्या हातामध्ये एक लोखंडी सळई होती. सळईचा स्पर्श वीजवाहिनीला लागल्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये त्याच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. आदीचे हात व पाय गंभीर जखमी झाल्याने निकामी झाले.

सोडमिसे यांच्या दुमजली घरापासून केवळ एक फुटाच्या अंतरावरच महावितरणने मोठे रोहित्र बसविलेले आहे. घराजवळूनच उच्चदाब वाहिनीही नेण्यात आली आहे. तपासामध्ये घरमालक व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electricity Shock Child Hand Leg brokendown