जिल्ह्यात अकराशे ऑक्‍सिजन बेड्‌स वाढविणार - सौरभ राव

Saurabh-Rao
Saurabh-Rao

पुणे - शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्‍सिजनविरहीत 2200 बेड्‌सपैकी निम्मे अकराशे बेड्‌स हे 30 ऑक्‍टोबरपर्यंत ऑक्‍सिजन बेड्‌स करण्याचे निर्देश दिले आहेत. या खासगी रुग्णालयांना ऑक्‍सिजनचा सुरळीत पुरवठा करण्यासोबतच आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार या वेळी उपस्थित होते. राव म्हणाले, पुणे जिल्ह्यात "कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमंतर्गत जिल्ह्यात 12 लाख 70 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ आणि जोखमीचे आजार असलेल्या 60 हजार नागरिकांचा समावेश होता. त्यात एक हजार 653 बाधित व्यक्ती आढळून आल्या असून, त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात येत आहेत. या मोहिमेची जनजागृती करण्यासाठी कलाकारांना ब्रॅंड अँबेसिडर म्हणून नेमण्यात येणार आहे. 

जिल्ह्यात ऑक्‍सिजन, आयसीयू बेड्‌स आणि वेंटिलेटरची कमतरता भासू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ससून आणि जम्बो रुग्णालयात आणखी बेड्‌सची संख्या वाढविण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांतील 79 टक्‍के बेड्‌सपैकी पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एक हजार 769 ऑक्‍सिजनविरहीत बेडस उपलब्ध आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात असे एकूण 2200 ऑक्‍सिजनविरहीत बेड्‌स उपलब्ध आहेत. त्यापैकी अकराशे बेड्‌सचे रूपांतर ऑक्‍सिजन बेड्‌समध्ये करण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन करण्यासाठी 108 क्रमांकाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. रुग्णांना वेळेवर आणि योग्य दरात रुग्णवाहिका मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयांकडून अडीच कोटींची जादा आकारणी 
खासगी रुग्णालयांमध्ये बिल आकारणीचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. कोणत्याही रुग्णाची तक्रार येऊ नये, अशा सूचना रुग्णालयांना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांत एकूण एक हजार 162 बिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रुग्णालयांनी अडीच कोटी रुपये जादा बिल आकारल्याचे दिसून आले. ते बिल कमी केल्यामुळे रुग्णांच्या अडीच कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे राव यांनी सांगितले. 

"एअर लिक्विड'कडून लवकरच ऑक्‍सिजन पुरवठा 
ऑक्‍सिजन उत्पादन करणारी मोठी कंपनी असलेल्या "एअर लिक्विड'कडून ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उत्पादनास सुरुवात होईल. तोपर्यंत जिल्ह्यासह भरूच आणि इतर इतर कंपन्याकडून ऑक्‍सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच, रत्नागिरी येथून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑक्‍सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

बेड्‌सची कमतरता नाही : जिल्हाधिकारी 
ग्रामीण भागात बेड्‌सची कमतरता भासू नये, यासाठी राज्य कर्मचारी विमा रुग्णालय, विप्रो आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून बेड्‌स उपलब्ध केले आहेत. ऑक्‍सिजनचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे. आठवड्याला 24 हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com