बारामतीतील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील अकरा जणांचे अहवाल... 

संगीता भापकर
Wednesday, 20 May 2020

मुर्टी येथे मुंबईवरून स्वगृही आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी (ता. 17) उघडकीस आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासह इतर अकरा जणांना कोरोना तपासणीसाठी दाखल केले होते.

मोरगाव (पुणे) : बारामती तालुक्‍यातील मुर्टी येथे मुंबईवरून स्वगृही आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी (ता. 17) उघडकीस आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासह इतर अकरा जणांना कोरोना तपासणीसाठी दाखल केले होते. त्यातील दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, त्या व्यक्तीच्या सतरा वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली. 

लय भारी...शिवरीकरांच्या खड्या पहाऱ्याने कोरोना पळाला कोसो दूर...  

मुर्टीत सापडलेला रुग्ण व त्यांच्याबरोबर अजून एक कुटुंब 12 मे रोजी मुंबईवरून मूळ गावी मुर्टी येथील चिरेखाणवाडी येथे आले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी मुर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. त्या सर्वांना होमक्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील एकास त्रास सुरू झाल्यानंतर त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. तो रुग्ण 17 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सहा जण त्यांच्या बरोबर मुंबईवरून आलेल्या दुसऱ्या कुटुंबातील चार जण आणि मुर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी केलेला एकजण, अशा अकरा जणांना कोरोना तपासणीसाठी बारामती येथे पाठविण्यात आले होते. आज त्यातील दहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; तर कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

मुळशीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची भीती

दरम्यान, मुर्टीतील कोरोना रुग्णाशी संपर्क आलेल्या मोरगावमधील त्याच्या एका नातेवाईकासही मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. मोरगाव ग्रामपंचायतीने गावच्या सीमेवरील गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मेडिकल आणि हॉस्पिटलवगळता संपूर्ण गाव बंद ठेवले असल्याची माहिती मोरगावचे सरपंच नीलेश केदारी यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुर्टी व मोढवे गाव प्रशासनाने कंटेनमेंट झोन आणि मोराळवाडी, उंबरवाडी, जोगवडी बफर झोन म्हणून जाहीर केलेला आहे. मुख्य रस्ता वगळता गावातील सर्व रस्ते बंद केले आहेत. गावातील तसेच सर्व दुकाने (मेडिकल व दवाखाना सोडून) पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. त्यामुळे नागरिकांनी घरात राहून सुरक्षित राहावे व ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. 

मुर्टी येथे बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी भेट देऊन नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत बाहेर न पडून घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven reports of contact with a corona patient in Baramati