पुण्यात तातडीची रिक्षासेवा सुरू ठेवणार; पोलिस-रिक्षा संघटनांच्या बैठकीत निर्णय 

ri.jpg
ri.jpg

पुणे ः शहरातील लॉकडाउनच्या काळात तातडीच्या मदतीसाठी रिक्षा सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय पोलिस आणि रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मंगळवारी ठरले. अनेक रिक्षाचालकांनी या वेळी सिटी ग्लाईडची सेवा सुरू ठेवण्याची मागणी पोलिसांकडे केली. या बाबत पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम निर्णय घेणार आहेत. 

वाहतूक पोलिस, आरटीआे, रिक्षा पंचायत आणि सिटी ग्लाईड यांच्यातर्फे शहरात 9850198501 या दूरध्वनी क्रमांकाद्वारे गेले चार महिने तातडीच्या मदतीसाठी अहोरात्र रिक्षा सेवा सुरू आहे. 13 जुलैपासून सिटी ग्लाईडने प्रती रिक्षाचालक प्रती दिन 20 रुपये आकारण्यास सुरवात केली आहे. त्याला आम पार्टीच्या रिक्षा संघटनेने विरोध केला आहे. तसेच अॅप बेस सेवा मोफत दिली पाहिजे, अशी त्यांची  मागणी आहे. मात्र, कॅब कंपन्या एका फेरीसाठी चालकाकडून 25 ते 40 रुपये कमिशन घेतात. तसेच कर्मचाऱयांचा पगार, इंटरनेट, वीज खर्च आदींसाठी 20 घेणे गरजेचे आहे अन बहुसंख्य रिक्षाचालकांची त्याला तयारी आहे, असे सिटीग्लाईडने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस विभागातील सहायक आयुक्त एन. पी. वाकुडे, पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी रिक्षासंघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी बैठक घेतली. त्यात रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, आम आदमी रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य, सिटी ग्लाईडचे राहुल शितोळे तसेच दत्ता घुले, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशनचे प्रतिनिधी आणि काही रिक्षाचालक उपस्थित होते. 

राज्य सरकारचा लॉकडाउन 31 जुलैपर्यंत आहे. प्रवाशांना तातडीच्या सेवेसाठी रिक्षासेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. 25 मार्च ते 20 जून दरम्यान 22 हजार नागरिकांनी या रिक्षासेवेचा फायदा घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच या बाबत काही तक्रारी असतील तर त्या दूर करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. सिटी ग्लाईडचे शितोळे यांनी पोलिसांनी दिलेल्या 500 पैकी 300 पास परत केले आहेत, असे सांगितले. त्यावर पोलिसांनी आयुक्तांशी चर्चा करून या बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तसेच काही रिक्षाचालकांशी चर्चा केली. त्यांनीही 20 रुपये कमिशन देण्याची तयारी असल्याचे सांगितले. या प्रकाराबाबत रिक्षाचालक सत्यनारायण जोशी म्हणाले, लॉकडाउनच्या काळात तातडीच्या रिक्षा सेवेमुळे चालकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि पेशंट यांनाही या सेवेचा उपयोग होत आहे. त्यामुळे ही योजना सुरू राहणे गरजेचे आहे. 

यातील एक पर्याय पोलिस निवडणार 
- सिटीग्लाईडची अॅप बेस (9850198501) ही रिक्षा सेवा सुरू ठेवणे
- प्रत्येक पोलिस चौकीला 5 डिजीटल पास देऊन तेथून रिक्षा सुरू ठेवणे
- आम आदमी पक्षामार्फत रिक्षा सेवा नव्याने सुरू करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com