esakal | पिरंगुटला लसीकरणासाठी ग्रामपंचायतीचा समूपदेशनावर भर

बोलून बातमी शोधा

coronavirus

पिरंगुटला लसीकरणासाठी नागरिकांचं समुपदेशन; ग्रामपंचायतीचा पुढाकार

sakal_logo
By
धोंडिबा कुंभार

पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीने कोरोनाचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी कंबर कसली असून विविध पातळीवर उपाययोजना प्रभावी राबवायला सुरवात केली आहे. लसीकरणावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी नागरिकांचे समूपदेशन करून सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. प्रभागनिहाय लसीकरणाला प्राधान्य दिल्याने आजपर्यंत एकूण सव्वा तीन हजारांहून अधिक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तपासणी नाके , चौकशी कक्ष, कोरोना केअर सेंटर, सॅनिटायझेशन, फवारणी, रुग्णांना अॅंब्युलन्स, उपचार उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने अहोरात्र सुरू आहे. सध्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

हेही वाचा: जुन्नर नगर पालिकेच्या कोरोना योद्ध्यांची कामगिरी प्रशंसनीय

गावची लोकसंख्या सुमारे बावीस हजाराच्या आसपास असून पंचेचाळीस वर्षे वयावरील नागरिकांचे समूपदेशन करून लसीकरणासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरपंच चांगदेव पवळे यांनी सांगितले की, गावातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता पंचायत समिती तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने येथील प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी उपसरपंच व सर्व सदस्य आपापल्या प्रभागात ग्रामस्थांशी संवाद साधून समूपदेशन करीत आहेत. कोरोना पॅाझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना तातडीने उपचारांसाठी दाखल केले जात आहे. गावच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावल्याने विनाकारण फिराणाऱ्यांना चाप बसला आहे.

हेही वाचा: कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय भोजणे यांनी सांगितले की , गेल्या तीन महिन्यांत १५० कोरोनाबाधित आढळले असून त्यातील नव्वद जण बरे झालेले आहेत. सध्या ६१ रुग्णांवर उपचार चालू असून ३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ग्रामपंचायतीने लसीकरणावर भर दिला आहे. व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे यांनी सांगितले की , पिरंगुट परिसरातील सर्व व्यापाऱ्यांची व कामगारांची अॅंटिजेन टेस्ट सुरू केली असून कालपर्यंत एकूण २६६ टेस्टींग झाल्या असून त्यांपैकी १६ पॅाझिटिव्ह आल्या आहेत.