हिंजवडी 'आयटी पार्क'मध्ये होणार कमर्चारी कपात?

सुवर्णा नवले
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

- दहा टक्के कर्मचारी कपातीची 
एका बलाढ्य कंपनीकडून घोषणा 

- वरिष्ठ पदांसह गलेलठ्ठ पगाराच्या 
अधिकाऱ्यांचा कपातीत समावेश 

पिंपरी (पुणे) : माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका 'बलाढ्य' कंपनीने दहा टक्के कर्मचारी कपातीची घोषणा गेल्या आठवड्यात केली. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपनीने असा थेट निर्णय घेतल्याने 'आयटीयन्स'नी टर्मिनेशन्सचा धसका घेतला आहे.
 
हिंजवडी आयटी क्षेत्रात शंभरहून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. देशपातळीवरील बऱ्याच कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. हिंजवडी आयटीमधील 25 हजारांवर कर्मचारी कामाला असलेल्या एका नामाकिंत कंपनीचा यात समावेश आहे. जेएल (जॉब लेवल) सहापासून ते जेएल आठपर्यंत येथे उच्च पदस्थांसह कर्मचारी कार्यरत आहेत. आकर्षक पॅकेज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना असल्याने सर्वांत मोठा धोका हा त्यांनाच आहे. वरिष्ठ पदासह इतर पदांनाही कंपनी हात घालणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर टांगती तलवार आहे. प्रचंड पगार असलेल्या कर्मचाऱ्यांत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, एक्‍झिक्‍युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट अशा पदांचाही समावेश आहे. यात काही मध्यम व निम्न श्रेणी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 

'कॉग्निझंट' कंपनीने तेरा हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात केली. तेव्हापासून आयटी क्षेत्रावर मंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यात आणखी एका "बलाढ्य' कंपनीने 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचे सांगून मंदीचा बॉम्ब टाकला आहे. आयटी क्षेत्रातील मंदी त्यामुळे प्रकर्षाने समोर आली आहे. येत्या काही कालावधीत कंपनी कधीही कर्मचाऱ्यांना थेट घरी बसण्यास सांगू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

गलेलठ्ठ पगार धोकादायक 
कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देऊन कामावरून तत्काळ काढून टाकणे घातक आहे. हिंजवडी, तळवडेसह मगरपट्टा, खराडी, सेनापती बापट रस्ता असे मिळून पुणे कार्यक्षेत्रात आठ ते दहा आयटी पार्कमध्ये लाखो कर्मचारी आहेत. हिंजवडीमध्ये सिंटेल, टाटा, टेक महिंद्रा, क्रेव्ह, व्हीसिनर्जी अशा नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. जिथे पगारवाढ चांगली मिळेल तिथे आयटीयन्स कंपन्या बदलून काम करीत आहेत. एकदा हातातील चांगली नोकरी गमावल्यानंतर दुसरीकडे काम मिळणे येथून पुढील कालावधीत कठीण आहे. शिवाय वयोगटही आता कारणीभूत ठरतो, असे गाऱ्हाणे आयटीयन्सचे आहे. 

- राज्य सरकारकडून समिती स्थापन करणे आवश्‍यक 
- आयटीयन्सला हवे कामगार कपातीचे स्वतंत्र धोरण 
- नोटीस पिरियडलाही कंपन्यांकडून केराची टोपली 

आयटी पार्कमधील एका मोठ्या कंपनीनेच हा निर्णय घेतल्याने छोट्या कंपन्याही आता कर्मचारी कपातीचा निर्णय घ्यायला सरसावतील. कंपनीने कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पॅकेज दिले. त्यामुळे आता बाहेरील कंपन्यांत काम मिळणे अवघड आहे. आयटीयन्सना मानसिक धक्‍यातून सावरता येणार नाही. जुने कर्मचारी काढून नवीन कर्मचारी भरती केले जाणे हे चुकीचे आहे. 
- पवनजित माने, हिंजवडी फाईट युनियन, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: employee deduction from IT companies in hinjwadi