रोजगार हमी योजनेवर २७० मजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मार्च 2019

जळगाव सुपे (ता. बारामती) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल २७० मजूर काम करत आहेत.

उंडवडी - जळगाव सुपे (ता. बारामती) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर तब्बल २७० मजूर काम करत आहेत.

बारामती तालुक्‍याच्या जिरायती भागात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असून, जळगाव सुपे येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम गेल्या तीन महिन्यांपासून वेगात सुरू आहे. या कामावर गावातील व वाड्यावस्त्यांवरील २७० मजूर दाखल झाले आहेत. यामध्ये ७० पुरुष व २०० महिलांचा समावेश आहे. येथे मजुरांमार्फत नाला खोलीकरणाचे काम वेगात सुरू आहे. नाला खोलीकरणातून निघालेला गाळ शेतकरी स्वखर्चाने ट्रॅक्‍टर-ट्रॉलीच्या साह्याने शेतात टाकत आहेत. यासाठी ५ ट्रॅक्‍टर- ट्रॉली दाखल झाले आहेत. या गाळामुळे परिसरातील सात ते आठ एकर नापिक जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे. नाला खोलीकरणामुळे पाणी अडून ते जिरल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होईल.

पगार थकीत
मजूर यशवंत जाधव व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर जगताप म्हणाले, ‘दुष्काळामुळे लोकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना फायदेशीर ठरत आहे. मात्र, मजुरांचे पगार वेळेत होत नाहीत. मागील चार आठवड्यांचा पगार थकीत आहे. गावचा उरुस दोन दिवसांवर आला आहे. सरकारने दोन दिवसांत थकीत पगार तातडीने मजुरांच्या बॅंक खात्यावर जमा करावेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment Guarantee Scheme 270 Labour