रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखती एक महिन्यापूर्वीच झाल्या. मात्र, अद्यापही निवड प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.  

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रिक्त पदांसाठी लेखी परीक्षा व मुलाखती एक महिन्यापूर्वीच झाल्या. मात्र, अद्यापही निवड प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण कायम आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.  

विविध हंगामी पदांचा सहा महिन्यांचा कार्यकाल १८ नोव्हेंबरला संपला. नवीन पदे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने २९ ऑक्‍टोबरला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार विविध पदांच्या लेखी परीक्षा व मुलाखती १३, १४  व १५ नोव्हेंबरला पूर्ण झाल्या. मात्र, निवड प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने अद्यापपर्यंत कोणतीच रिक्त पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये चिडचिड
नियमानुसार सहा रुग्णांसाठी एक परिचारिका असणे गरजेचे आहे. मात्र, वायसीएममध्ये ५० रुग्णांसाठी एक परिचारिका आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाकडे जाऊन लक्ष देता येत नसल्याचे परिचारिकांनी सांगितले. नातेवाइकांबरोबर होणारे वाद व कामाचा ताण यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिडचिड निर्माण होत आहे.
औषधांच्या डोसमध्ये अनियमितता.

वॉर्डात दाखल केलेल्या रुग्णांना सकाळी, दुपारी व रात्री दिले जाणारे औषधांचे डोस उशिराने मिळत आहेत. रात्रीच्या डोसचे काम उशिरापर्यंत चालत असल्याने रुग्णांना झोपण्यास उशीर होत आहे. तर काही कामचुकार कर्मचारी रुग्णांना औषधे न देताच दिल्याची नोंद करत असल्याचे प्रकार घडत आहेत.

सहा महिन्यांसाठी मानधनावरील हंगामी पदाची नवीन भरती सुरू आहे. परीक्षा व मुलाखत दिलेल्या उमेदवारांपैकी निवड झालेल्या उमेदवारांची यादी आठ दिवसांत जाहीर केली जाणार आहे. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Empty Post Recruitment Process