'अतिक्रमण'च्या उपायुक्तांना धमकी; ज्येष्ठ नागरिकासह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

पुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात घडली. 

पुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विभाग उपायुक्तांच्या कार्यालयात घडली. 

मोहम्मद हुसेन इस्माईल शेख (वय 58), महेंद्र अशोक रसाळ (वय 36, दोघेही रा. हडपसर) या दोघांसह एका ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी माधव जगताप (वय 47, रा. सदाशिव पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप हे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे उपायुक्त म्हणून काम पाहतात.

जगताप यांच्या आदेशानुसार, बुधवारी हडपसर येथील सासवड रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी गुरुवारी जगताप यांच्या कार्यालयात येऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी फेरीवाल्यांनी आरडाओरडा करून जगताप यांना कार्यालयाबाहेर जाण्यापासून रोखले; तसेच त्यांना बघून घेऊ, अशा शब्दांत धमकी दिली.

त्यामुळे जगताप यांनी त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरून तिघांना अटक करण्यात आली. यापूर्वी येरवडा येथे अतिक्रमण कारवाईवेळीही जगताप यांना काही फेरीवाल्यांकडून मारहाण झाली होती. 

फुरसुंगीतही एकाला अटक 

बुधवारी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विश्‍वनाथ बोटे (वय 27) हे फुरसुंगी येथे अतिक्रमण कारवाई करत होते. त्या वेळी त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी तिघांनी त्यांची कार आडवी लावली. तसेच फिर्यादी व अन्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

त्याप्रकरणी बोटे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सूरज गायकवाड (वय 25, रा. हडपसर) यास पोलिसांनी अटक करून त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गायकवाड हा रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) कार्यकर्ता असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: Encroachment Deputy Commissioner threatens Three people were arrested