बाजार परिसराने घेतला मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

पुणे - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाने दिवाळीनंतर सुरू केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई आता कायमस्वरूपी होण्याची चिन्हे आहेत. कॅंटोन्मेंट प्रशासनाने बारा दिवसांत केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण खडकी बाजार परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे, तर पदपथावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे हटवीत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाने आत्तापर्यंत दीडशेहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

पुणे - खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाने दिवाळीनंतर सुरू केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई आता कायमस्वरूपी होण्याची चिन्हे आहेत. कॅंटोन्मेंट प्रशासनाने बारा दिवसांत केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण खडकी बाजार परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे, तर पदपथावर दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे हटवीत प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाने आत्तापर्यंत दीडशेहून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

खडकी कॅंटोन्मेंटमधील खडकी बाजार परिसर आणि रहदारीच्या ठिकाणी मागील काही वर्षांपासून फळविक्रेते, कपडे विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स अशा विविध प्रकारचे अतिक्रमण वाढले होते. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी या वाढत्या अतिक्रमणांविरुद्ध ठोस कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिल्या होत्या. त्यानुसार 8 नोव्हेंबरपासून प्रशासनाने धडक कारवाईचा निर्णय घेतला. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने लोकप्रतिनिधींना या कारवाईत हस्तक्षेप करता आला नाही.

खडकी बस स्थानक, फिश मार्केट, भाजी मंडई, आंबेडकर रस्ता आणि अन्य प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, बांधकामे प्रशासनाने पाडली.

याबरोबरच बस स्थानकासह परिसरातील स्टॉल्स, हातगाड्याही काढण्यात आल्या. आरोग्य विभागाचे अधीक्षक विलास खांदोडे, महसूल विभागाचे प्रमुख भगीरथ साखळे, मुख्य अभियंता अरुण गोडबोले यांनी खडकी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. ही कारवाई अजूनही सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत, तर सोमवारपासून पार्किंगच्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने लावणाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.

साखळे म्हणाले, 'अतिक्रमणविरोधी कारवाईवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्यामुळे सध्या खडकीकरांना फायदा होऊ लागला आहे. कारवाईला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली जात आहे.''

बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे म्हणाले, 'वीस वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी बोर्डाच्या अध्यक्षांकडे समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या लोकांची छाननी करून त्यांच्यासाठी "हॉकर्स झोन' सुरू करावा, यासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील राहतील.''

अधिकाऱ्यांनाही होता त्रास
खडकी बाजार परिसरात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अनधिकृत हातगाड्या, टपऱ्या आणि अन्य व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात होते, तर काहींचे शोषण केले जात होते. याबरोबरच बोर्डाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला जात होता. या पार्श्‍वभूमीवर बोर्ड प्रशासनाने खडकी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

Web Title: encroachment in khadki bazar