रिंगरोडसाठी ‘हातोडा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडवरील काळेवाडी फाट्यावरील २५ अतिक्रमणे हटविण्यास शनिवारी (ता. २०) सकाळी सुरवात केली. आजपर्यंत प्राधिकरणाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती उपअभियंते वसंत नाईक यांनी दिली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडवरील काळेवाडी फाट्यावरील २५ अतिक्रमणे हटविण्यास शनिवारी (ता. २०) सकाळी सुरवात केली. आजपर्यंत प्राधिकरणाने केलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती उपअभियंते वसंत नाईक यांनी दिली.

काळेवाडी फाट्याकडून औंधकडे जाणाऱ्या मार्गालगत ३० मीटरचा रिंगरोड प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात आहे. या मार्गावर अनेकांनी बंगले, निवासी इमारती, गोदामे बांधली. रिंगरोडचे काम लवकरच हाती घेण्याचे नियोजन असल्याने अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर प्राधिकरणाने बुलडोझर चालवला. पहिल्या टप्प्यात काळेवाडी फाटा ते कोकणे चौक येथील २५ अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. पुढील आठवड्यातही अशाच कारवाईचे नियोजन आहे.

शनिवारी सकाळी प्रचंड पोलिस बंदोबस्तात काळेवाडी फाटा येथे कारवाईला सुरवात केली. मूळ जमीन मालकांनी या कारवाईला आक्षेप घेतला.

‘आम्हाला मोबदला द्या, मगच कारवाई करा’, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांचा विरोध मावळला. येथील काही रहिवाशांनीही कारवाईला विरोध केला. मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने त्यांचाही विरोध फार वेळ टिकला नाही. रहिवाशांना घरातील साहित्य काढण्यासाठी दोन तासांची मुदत प्राधिकरणाकडून देण्यात आली होती.

नाईक म्हणाले, ‘‘येथील रहिवाशांना २०१४ आणि नुकत्याच ५ मे रोजी नोटीस देऊन आठवडाभराची मुदत दिली होती. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांनी कारवाईला सुरवात केली आहे. काही नागरिक न्यायालयात स्थगिती आणण्यासाठी गेले होते. न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे प्राधिकरणाने मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके व उपकार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. आज १०० पोलिस, प्राधिकरणाचे ५० कर्मचारी, २५ मजूर यांच्यासह तीन पोकलेन व दोन जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली.’’

रिंगरोडसह विकास आराखड्यातील सर्व आरक्षित जागांवर असलेली अनधिकृत बांधकामे पाडणार आहोत. काळेवाडीतील कारवाई हा त्याचाच एक भाग आहे.
- सतीश खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

मोनोरेलचा प्रस्ताव
अतिक्रमण हटविण्याची कारवाई प्राधिकरणाच्या हद्दीतील बांधकामांवर सुरू आहे. हे पूर्ण अतिक्रमण नियोजित अंतर्गत रिंगरोडवर आहे. पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत उच्चक्षमता बहुद्देशीय वाहतूक मार्गाची (एचसीएमटीआर) तरतूद पूर्वी केलेली आहे. तीस मीटर रुंदीचा हा मार्ग तीस किलोमीटर लांबीचा असून तो कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, रावेत, भक्ती-शक्ती चौक, स्पाइन रोड, टाटा मोटर्स मटेरिअल गेट, वायसीएम रुग्णालय, नाशिक फाटा असा प्रस्तावित आहे. यातील सुमारे सत्तर टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात असून, तीस टक्‍के जागेवर अतिक्रमण आहे. यातील मोठे अतिक्रमण प्राधिकरणाच्या ताब्यातील जागेवर असून, काही टाटा मोटर्स मटेरिअल गेटपासून नाशिक फाट्याकडे येणाऱ्या मार्गावर आहे. या ठिकाणी झोपड्या आहेत. राज्य सरकारचा या मार्गावर मोनोरेल सुरू करण्याचा विचार आहे.

‘त्या’ आठ रहिवाशांच्या संसाराचे काय?

विकास आराखड्यातील नियोजित रिंगरोडकरिता प्राधिकरणाने शनिवारी अतिक्रमण कारवाई सुरू केली. त्यामध्ये ‘हरिओम प्लाझा’ या इमारतीचाही समावेश आहे. बहुतांश जणांनी आपले घर खाली केले, मात्र आठ कुटुंबे घराला कुलूप लावून सुटीत गावाला गेले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांना घर खाली करण्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

हरिओम प्लाझा इमारतीमध्ये एका बिल्डरने २४ सदनिका बांधल्या. त्याची विक्री करताना आम्ही प्राधिकरणाकडे प्लॅनमंजुरीसाठी दिला आहे, लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असे आश्‍वासन दिले. शहरात एवढी अनधिकृत बांधकामे आहेत. ती लवकरच नियमित होणार आहेत. त्यामुळे तुमचेही घर नियमित होईल, असेही त्या बिल्डरने सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून दागिने विकून, कर्ज काढून आम्ही घर घेतले. मात्र आता एका दिवसात होत्याचे नव्हते होणार असल्याचे सांगताना येथील रहिवाशांना अश्रू अनावर झाले. 

आपल्या इमारतीवरही कारवाई होणार का? याबाबत केवळ चर्चा सुरू होती. शनिवारी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सामान काढण्यासाठी दोन तासांची मुदत दिली. मात्र, दोन तासांत कुठे घर शोधणार आणि सामान कधी शिफ्ट करणार, असा प्रश्‍न आमच्यासमोर असल्याचे अन्य एका रहिवाशाने सांगितले. आम्ही इथे आहोत, घरातील सामान बाहेर काढू. मात्र आमच्या इमारतीतील आठ कुटुंब गावाला गेले आहेत. त्यांच्या घरातील सामानाचे काय, प्राधिकरणाचे अधिकारी म्हणतात की आम्ही त्याला काही करू शकत नाही. कारवाई तर होणारच. त्या रहिवाशांना हा दुहेरी धक्‍का असेल.

हरिओम प्लाझा इमारतीतील रहिवाशांना १५ दिवसांपूर्वी कारवाईबाबत सूचना दिली होती. शनिवारीही घरातील सामान हलविण्यासाठी दोन तासांची मुदत दिली. या इमारतीचे पाणी, वीजकनेक्‍शन खंडित केले आहे. काही भिंती पाडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत ही इमारत पूर्णपणे पाडण्यात येईल.
- वसंत नाईक, उपअभियंता, प्राधिकरण

Web Title: encroachment for ringroad