नदीपात्रात अतिक्रमण

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - मुठा नदीपात्रालगत पूररेषेच्या आत (रेड लाइन) राडारोडा आणि भराव टाकून जागा बळकावण्याचा ‘उद्योग’ काही मंडळी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्वेनगरमधील (सर्व्हे क्र.९) नदीपात्रालगत राडारोडा टाकून जवळपास ४० गुंठे जागेचे सपाटीकरण करण्यात येत असून, ती व्यावसायिक कारणांसाठी वापरण्याचा संबंधितांचा उद्देश असल्याचा संशय आहे. दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या या कामाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

शहराच्या हद्दीतून मुठा नदीचा सुमारे ४२ किलोमीटर प्रवाह वाहतो. पूरस्थितीच्या काळात अनुचित घटना घडू नये, या करिता पूररेषेच्या आत भराव टाकण्यास बंदी आहे. पाटबंधारे खात्याने २१ सप्टेंबर १९८९ मध्ये तसा अध्यादेश काढला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत, सर्रास राडारोडा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. कर्वेनगरमधील या जागेत आतापर्यंत जवळपास दीड ते दोन हजार ट्रक राडारोडा पडल्याचे दिसून येते. ज्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. आजूबाजूची जागाही बळकावण्याचा प्रयत्न सुरू असून, रोज मध्यरात्री ट्रक आणले जात असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. बेकायदा भराव टाकून जागा ताब्यात घेण्याचा प्रकार स्थानिक रहिवाशांनी निदर्शनास आणून दिला. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणाची चौकशी करून तातडीने कार्यवाहीचा आदेश दिला. मात्र चौकशीची चक्रे अजूनही फिरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वरिष्ठांच्या आदेशाला महिना उलटून गेला तरी, राडारोडा टाकणाऱ्यांचा साधा शोधही लागलेला नाही. 

नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले, ‘‘पूर रेषेत असतानाही या भागात अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे. बैठी घरे उभारण्याच्या उद्देशानेच भराव टाकला आहे. शेजारीच पत्र्याचे शेड उभारले आहेत. त्यावर कारवाई झाली नसल्याने धाडस वाढले आहे. याची महापालिकेतील अधिकाऱ्यांना कल्पना असूनही ते कारवाई का करीत नाहीत.’’ 

याबाबत बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
- श्रीनिवास बोनाला, अतिरिक्त नगर अभियंता, महापालिका

Web Title: Encroachment in river