डिसेंबरअखेर आणखी एक हजार बस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पीएमपीच्या बससेवेला संजीवनी देण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे एक हजार नव्या बस येणार आहेत.

पुणे - पीएमपीच्या बससेवेला संजीवनी देण्यासाठी या वर्षाच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे एक हजार नव्या बस येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरअखेर या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पीएमपीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

पीएमपीच्या आताच्या ताफ्यातील अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. त्यांची तात्पुरती दुरुस्ती करून त्या रस्त्यावर उतरविल्या जातात. त्यामुळे या बस अनेकदा भर रस्त्यात बंद पडल्याचे दिसते. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. या बस सेवेतून निवृत्त करण्यासाठी पीएमपीला नव्या बसची गरज आहे. या बस खरेदीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. 

या वर्षाअखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात ९४० नव्या बस दाखल होणार आहेत. या बस आल्यानंतर पीएमपीचे ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या पीएमपीच्या ताफ्यात पीएमपी आणि भाडेतत्त्वावरील अशा एकूण २,०३० बस आहेत. यातील अनेक बसचे आयुर्मान संपलेले असल्यामुळे त्या रस्त्यावर बस बंद पडतात. चालू बसला आग लागणे, छोटे-मोठे अपघात होणे अशा घटनांमध्येही वाढ झाली आहे. नवीन बस रस्त्यावर आल्यानंतर प्रवाशांचा पीएमपीचा बस प्रवास सुखदायी होईल. इंधन बचत होईल. तसेच पीएमपीच्या उत्पन्न वाढीला हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रवाशांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून ई-बस व सीएनजी बस अशा ९४० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. या वर्षाखेरपर्यंत या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील.
- अजय चारठणकर,  सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: end of this year one thousand new buses will be set up in the PMP bus service