नगर नियोजनासाठीची दमदार पावले आशादायक

सुनील माळी
बुधवार, 4 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

मेट्रोसह रिंगरोडच्या कामांना वेग, ‘पीएमआरडीए’च्या कामांची रूपरेषा ठरवून त्यांची कार्यवाही, पुण्याच्या आसपासच्या गावांच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सर्वांगीण विकासावर भर अशा विविधांगी नियोजनाची कालबद्ध अंमलबजावणी झाल्यास नागरी जीवनात मोठे बदल होतील...

पुणे आणि परिसराचे येत्या तीन वर्षांनंतरचे चित्र काय असेल...? पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्ग पूर्ण झालेले असतील आणि तिसरा अंतिम टप्प्यापर्यंत पोचलेला असेल... पुण्यातील अंतर्गत आणि बाह्य वर्तुळाकार रस्ता ‘बीआरटी’ तसेच लोहमार्गासहित पूर्णत्वाच्या मार्गावर असेल... पुणे परिसराचा चेहरामोहरा पालटून टाकण्याची ताकद असलेला ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा प्रत्यक्षात येण्यासाठी दमदार पावले टाकली जातील... नियोजनाच्या आघाडीवरील ही दमदार तयारी आशादायक असून, त्याची गतिमान कार्यवाही झाली तरच पुणे आणि परिसरातील गावांचा कायापालट होईल.

येत्या तीन वर्षांत पुणे कसे झालेले असेल, याची ही आहे केवळ प्रातिनिधिक यादी. पुणेकरांना आणि जिल्हावासीयांना या काळानंतर बराच दिलासा मिळालेला असेल, याचे कारण पुणे परिसरातील अनेक पायाभूत सुविधांना चालना मिळेल. पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू होण्याची चिन्हे दिसत असून, वेळेत काम पूर्ण करण्याचा निर्धार नियोजित ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पौड रस्त्यावरील वनाज ते नगर रस्त्यावरील रामवाडी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण झालेले असेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर लगेचच जाहीर झालेला आणि ‘पीएमआरडीए’ विकसित करणार असलेला हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्गही पूर्ण होईल. तसेच, पिंपरी ते स्वारगेट या तिसऱ्या टप्प्याच्या कामाने निम्म्यापेक्षा अधिक टप्पा ओलांडला असेल. याच दरम्यान, स्वारगेट- हडपसर या मार्गाचे, तसेच निगडी ते पिंपरी आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गांचीही आखणी पूर्ण झालेली असेल. त्याचप्रमाणे पुण्यातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याचे, म्हणजेच हाय कपॅसिटी मास ट्रान्स्पोर्ट रूटचे (एचसीएमटीआर) कामही वेगाने पुढे सरकलेले असण्याची अपेक्षा नियोजनकर्त्यांना आहे. बाह्य वर्तुळाकार रस्ता पूर्ण होणार नसला तरी इतर अडथळे न आल्यास त्याचेही काम प्रगतीपथावर असू शकेल.

पुणे, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि सुमारे आठशे गावे यांच्या विकासासाठी नेमलेल्या पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा म्हणजेच ‘पीएमआरडीए’चा विकास कसा करायचा, याचा आराखडा एक ते दीड वर्षात तयार होईल. त्यानंतरच्या दीड वर्षात त्याच्या अंमलबजावणीची प्राथमिक पावले टाकली जातील. मुख्य पुण्यावरील भार वाढू नये, यासाठी पुण्याच्या आसपास टुमदार स्वयंपूर्ण नगरे विकसित करण्याची योजना त्यात असणार आहे. घर आणि काम करण्याची जागा यांत फारसे अंतर असू नये. तसेच, शक्‍यतो पायी किंवा सायकलने कामावर जाता येईल, एवढ्या अंतरावरच उद्योगधंदे असतील, असे नियोजन त्यात असणार आहे. या परिसरातील नैसर्गिक संपदेला जपण्याची आणि वाढविण्याची विशेष व्यवस्था त्यात करण्यात येईल. या सर्व भागांतील पाणी आणि इतर नैसर्गिक संपत्ती किती लोकसंख्येला पुरेल, याचा अभ्यास करून तसा विकास केला जाईल.

पुणे परिसरात विविध प्रकारच्या उद्योग-धंद्यांची, तसेच शैक्षणिक संकुलांची वाढ होत असताना त्यामुळे विविध प्रकारची कौशल्ये असणाऱ्या कर्मचारीवर्गाची मोठ्या प्रमाणावर गरज लागेल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यवसायांची भरभराट होणार असल्याने व्यावसायिकांनाही मोठी संधी उपलब्ध होईल. पुणे परिसरात दोन रिंग रोडचे नियोजन करण्यात आले असून, त्यातील किमान एकाचे काम येत्या तीन वर्षांत मार्गी लागू शकेल. या रिंग रोडमुळे जिल्ह्याच्या समन्वित विकासाला चालना मिळेल. मुंबई, सोलापूर, नगर आणि सातारा हे महामार्ग शहराबाहेरूनच एकमेकांना जोडले जातील, त्यामुळे वाहतुकीची समस्या बऱ्याच अंशी सुटेल. दळणवळणाची साधने चांगली झाल्याने पुणे परिसराची अर्थव्यवस्थाच पालटून जाईल.

माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक सुविधा नागरिकांपर्यंत पोचविण्याचे उत्तम नियोजन इस्राईलमधील तेल अवीव शहरात झाल्याचे दिसून येते. अधिकाधिक नागरिकांना शहरातील घडामोडींची माहिती अल्पावधीत कळविण्यासाठी डिजिटल क्‍लबची स्थापना ही संकल्पना त्यापैकीच एक. यामधील सदस्यांना त्यांच्या मोबाईलवर शहरातील कार्यक्रमांची सूचना, तसेच इतर महत्त्वाची माहिती कळविण्यात येते. तेल अवीव या शहरातील स्टार्ट अपची संख्या लक्षणीय असून, त्यामध्ये नागरिकांना आवश्‍यक असलेल्या अनेक ॲप्सचा समावेश आहे. अशा प्रकारे अत्याधुनिक यंत्रणांची उभारणी पुण्यातही करणे आवश्‍यक आहे. त्याद्वारे नागरिकांचे आयुष्य अधिक सुखकर होऊ शकेल.

शहर वेगाने वाढतेच आहे; त्यामुळे त्याचे व्यवस्थापन अवघड बनत चालले आहे. जगभरात मोठ्या शहरांचे व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन ‘स्मार्ट’ केले जात आहे. त्यातूनच ‘स्मार्ट सिटी’चा जन्म झाला. आपणासही ‘स्मार्ट सिटी’ व्यवस्थापन स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. याच विषयावर मुंबईत नेहरू सेंटर येथे येत्या २४ व २५ जानेवारीला डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या उपस्थितीत व्यापक चर्चा होणार आहे.

तज्ज्ञ म्हणतात
वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाने ग्रासलेल्या पुणे महानगरास आज शाश्वत वाहतुकीच्या पर्यायांची अंमलबजावणी करण्याची तातडीने गरज आहे. यामध्ये २०२५ पर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण २०० कि.मी. बीआरटीचे जाळे आवश्‍यक आहे. यातील ८० किलोमीटर संचलनात अथवा प्रकल्प टप्प्यामध्ये आहे; पण अजूनही १२० किलोमीटरसाठी आर्थिक गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता 
प्रांजली देशपांडे 

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सुधारण्याबरोबरच ठराविक कालावधीनंतर वाहने मोडीत काढण्याची योजना हवी. तसे केल्यास रस्त्यावरील वाहनांची संख्या आणि प्रदूषण आटोक्‍यात राहील. बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर केल्यास त्या इमारतीमधील वाहनांचे पार्किंग नकाशात दर्शवूनच महापालिका बांधकामाचे नकाशे मंजूर करते. 
महेश कटारे

चांगले आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पुरेसा या योजनांची विश्‍वासार्हता तपासली पाहिजे; तसेच लाभार्थींचाही सहभाग असला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी स्वप्ने, गरजा आणि अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी दैनंदिन दळणवळण, स्वस्त-सुरक्षित- जलद वाहतूक ही सर्वांची गरज आहे. त्यासाठी सर्वसमावेशक समतोल जलद वाहतूक व्यवस्था आखली पाहिजे.
राजेंद्र माहुलकर 

महानगर क्षेत्रातील संस्था-प्राधिकरणे यांचा एकमेकांशी निगडित असलेला विचार; तसेच नियोजनाचे निकष आणि नियंत्रण आवश्‍यक आहे. नियोजनाचा एकात्मिक विचार हवा. उदा. गृहनिर्माणामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन व प्रतिबंधात्मक योजना, परवडणाऱ्या किमतीच्या घरांची निर्मिती, शासन व खासगी क्षेत्रातून निर्माण होणारी घरे, विशेष टाउनशिप्स असा अनेक स्तरांवरील कार्यक्रम कालबद्धरित्या राबविला पाहिजे.
संदीप महाजन 

प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधांचा आराखडा बनविणे हे पुढील तीन वर्षांतील सर्वांत मोठे काम राहील. लोकसंख्या वाढ, विकासाचा कल व विकासाचे प्रक्षेपण अचूकरीत्या होणे हे नियोजनकारांचे व तज्ज्ञांचे कसब आहे. ते योग्य व अचूक झाले तर मग या लोकसंख्येसाठी कोणकोणत्या पायाभूत सुविधा लगेच लागतील आणि कोणकोणत्या सुविधा पुढील पन्नास वर्षांत लागतील, याचे योग्य नियोजन करता येईल.
साधना नाईक

कचऱ्यातील उपयोगी-निरुपयोगी बाबी विकत घेणाऱ्यांचे, वैशिष्ट्यपूर्ण बाबी विकत घेणाऱ्यांचे, कचऱ्यासंदर्भात विविध सेवा देणारे, यंत्रसामग्री विकणारे, संशोधन करणारे, प्रशिक्षण देणारे या सर्वांचे योग्य नेटवर्किंग सरकारने केल्यास बहुतांशी कचरा विक्री व्यवस्थेत येईल. यासाठी पुण्यामध्ये सध्याचे कचरा रॅम्प अथवा डेपोंना अधिक निर्देशांक एफएसआय देऊन सुक्‍या कचऱ्याची मंडई उभारावी. 
किशोरी गद्रे

दिल्लीप्रमाणे पुण्यात हवेचे प्रदूषण वाढून सगळे शहर ठप्प होऊ शकते. सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रित नियोजन होणे गरजेचे आहे. तसेच, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी या करता विविध योजना राबवल्या पाहिजेत. सार्वजनिक वाहतुकीचे प्रकल्प राबवताना, नागरिकांना ती वापरण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे व पुणेकरांना त्याची सवय लावली पाहिजे.
अनघा पुरोहित-परांजपे  

मेट्रो चालू होईपर्यंत पीएमपीएलच्या माध्यमातून बस व्यवस्था बळकट करण्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. एकाच वेळेला मेट्रो, हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट सिस्टिमची कामे सुरू झाल्यास पुढच्या काळात जास्त ट्रॅफिक जॅम्स होताना दिसतील. मेट्रो आणि इतर कामाचे व्यवस्थापन नीट करणं खूप महत्त्वाचे आहे. शहराच्या बाहेरून रिंगरोड केला, तर कमीत कमी ती वाहने शहरात येणार नाहीत.
पूर्वा केसकर

रस्त्याने चालणे मुश्‍कील झाले असून, प्रदूषित हवा आणि वाहतूक कोंडी अधिक आहे. हा विकास केवळ २५ टक्‍क्‍यांसाठी असून, तळातील ५० टक्‍क्‍यांना त्याचे काय? त्यासाठी सर्वांना जाता येईल, अशी आरोग्य आणि शैक्षणिक सेवा, परवडणारी घरे, सार्वजनिक मोकळ्या जागा आवश्‍यक आहेत. पुढील तीन वर्षांत रास्त दरातील सार्वजनिक वाहतूक सेवा, प्रदूषणविरहित वातावरण तसेच सुरक्षा या बाबी सर्वांना उपलब्ध व्हायला हव्यात.
शरद महाजन

-----------------------------

मुंबईत होणाऱ्या डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या परिषदेत सहभागी होणारे मान्यवर वक्ते
-----------------------------

संशोधन, विकासाची दृष्टी
ख्रिस्तीन रिडेल, झेडकेएम, कार्ल्सऱ्हूच्या व्यवस्थापकीय संचालक 
विसाव्या शतकातील वास्तुरचना, साहित्य आणि कला यांच्या इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या ख्रिस्तीन यांचा समकालीन कला क्षेत्राबाबतही खास अभ्यास आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातून वास्तुरचना आणि नगरनियोजनावर विशेष लक्ष देणाऱ्या ‘ड्युशेस वेकबंद’च्या (डीडब्ल्यूबी) त्या १९९२ ते ९७ या कालावधीत सरव्यवस्थापक होत्या. वास्तुरचनेच्या आधुनिकीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी विशेष कार्य केले आहे. २००२ पासून त्या ‘सेंटर फॉर आर्ट अँड मीडिया कार्लस्‌ऱ्हू’च्या (झेडकेएम) सरव्यवस्थापक आहेत. नवमाध्यमांमधील संशोधन, विकास आणि निर्मितीमध्ये ‘झेडकेएम’चे विशेष योगदान आहे. सांस्कृतिक, वित्तीय क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या कार्लस्‌च्युशेल इंटरनॅशनल युनिव्हिर्सिटीमध्ये २००९ पासून त्या अध्यापन करीत आहेत. ‘साशा वाल्त्झ इन्स्टॉलेशन ऑब्जेक्‍टस्‌ परफॉमन्सेस’ या उपक्रमाच्या प्रोजेक्‍ट मॅनेजर होत्या.

नॉलेज मॅनेजमेंटचे गुरू
जोहर शेरॉन,चीफ नॉलेज ऑफिसर, तेल अवीव महापालिका, इस्राईल
तेल अवीव विद्यापीठातून जोहर यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. नॉलेज मॅनेजमेंटमधील विविध पारितोषिके मिळविलेल्या जोहर यांनी महापालिकेच्या सामाजिक सेवांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे. जोहर तेल अविव महापालिकेच्या नॉलेज मॅनेजमेंट प्रक्रियेचे सर्वेसर्वा आहेत. ‘डिजिटल इस्राईल’चीही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यातून शंभर टक्के डिजिटलकडील वाटचालीला हातभार लागत आहे. २०१४ मध्ये झालेल्या बार्सिलोना स्मार्ट सिटी एक्‍स्पो वर्ल्ड काँग्रेसमध्ये तेल अविव महापालिकेला जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी पुरस्कार मिळवून देण्यात जोहर यांच्या ‘डिजिटेल’ या रेसिडेन्ट क्‍लबचा सिंहाचा वाटा होता. शहराचे प्रशासन आणि नागरिक यांच्यात नागरी विषयांवर सर्वसमावेशक सुसंवाद घडवण्यात ‘डिजिटेल’ने मोलाचा वाटा उचलला आहे. तेल अविव शहराचा स्मार्ट सिटीच्या दिशेने झालेला प्रवास समजावून घेण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Web Title: Energetic steps of the Town Planning