esakal | कॉपी करण्यात 'इंजिनिअरिंग'चे विद्यार्थी आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

कॉपी करण्यात 'इंजिनिअरिंग'चे विद्यार्थी आघाडीवर

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रथम सत्राच्या ऑनलाइन परिक्षेत ३५० विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावले असता त्यातील बहुतेक विद्यार्थी अभियांत्रिकी (engineering) किंवा तंत्रज्ञानाशी निगडित विद्याशाखेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा असा गैरवापर करणे धक्कादायक असून, अशा विद्यार्थ्यांवर आम्ही कडक कारवाई करत आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai Phule Pune univercity) विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिली आहे. (Engineering students lead copying online exam pune univercity)

विद्यापीठाला कोरोनाच्या (coona) पार्श्वभूमीवर ऑनलाइन परिक्षा (online exam) घ्यावी लागत आहे. एप्रिल-मे महिन्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा घेताना त्यात प्रोक्टॅर्ड पद्धतीचा वापर विद्यापीठाने सुरू केला. विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात होता. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होत असल्याने त्यावर गैरप्रकार केल्याची कारवाई केली जात आहे.

परीक्षा पद्धती कडक केल्याने परीक्षेतील तांत्रिक प्रश्‍न देखील कमी झाले आहेत. १२ जुलै पासून विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा सुरू झाली आहे. यामध्ये २८४ अभ्यासक्रमाचे ६ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यावेळी परीक्षेत कॅमेरा देखील आहेच, पण त्याचसोबत व्हाइस रेकॉर्डिंग देखील केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि इतर कोणाचा परीक्षेसंदर्भातील संवाद रेकॉर्ड झाल्यास कॉपी पकडली जात आहे. विद्यापीठाला संभाव्या कॉपी पद्धती लक्षात आल्या असून, विद्यार्थ्यांनीही या गैरप्रकारात अडकू नये असे आवाहन डॉ.चासकर यांनी केले आहे.

हेही वाचा: पाय घसरून विहिरीत पडले आजोबा, अग्निशमन दलानं वाचवले प्राण

ऑनलाइन ग्रुपचा वापर

कॉपी करताना सुसूत्रता यावी म्हणून काही लोकांनी चक्क विद्यापीठाच्याच नावाने विविध समाजमाध्यमांवर ग्रुप केले आहे. ज्याची विभागणी एसपीपीयु, डिपार्टमेंट आणि विषयाच्या नावानुसार केली आहे. प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट काढून संबंधित ग्रुपवर टाकला जातो. त्यानंतर ग्रुपवरील सदस्य त्याची उत्तरे देतात. मात्र, हे करत असताना विद्यार्थ्याच्या हालचाली, मोबाईल किंवा लॅपटॉपवरील विंडोबदल टिपला जातो आणि विद्यार्थी पकडले जातात.

हेही वाचा: 'रिक्षावाल्या काकां'च्या मुलीला मिळाले शंभर टक्के गुण !

टेक्नोसॅव्हीच्या विद्यार्थ्यांनी असे गैरप्रकार करणे अत्यंत चुकीचे

याबाबत बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर म्हणाले, "तंत्रज्ञानाच्या वापरातून टेक्नोसॅव्ही विद्यार्थी असे गैरप्रकार करणे अत्यंत चुकीचे आहे. आता विद्यापीठाकडे यंत्रणा असून, असे गैरप्रकार टिपले जातात. थेट पुरावा असल्यामुळे विद्यार्थ्यावरही कारवाई करता येते. आता द्वितीय सत्र परिक्षा चालू असून, विद्यार्थ्यांनीही अशा गैरप्रकारांपासून दूर रहावं."

प्रथम सत्र परीक्षेचा तपशील

परीक्षेचा कालावधी - एप्रिल - मे

एकूण अभ्यासक्रम - २८४

परीक्षार्थी - ५.७९ लाख

गैरप्रकार करणारे परीक्षार्थी - ३५०

अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विद्याशाखेशी निगडीत गैरप्रकाराचे प्रमाण - सुमारे ८० टक्के

loading image