इंग्रजी शाळांमुळेच वाचनसंस्कृती घसरली - अक्षयकुमार काळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - 'आपल्याकडे पुस्तकांच्या विक्रीवरून वाचनसंस्कृती ठरवली जाते. हे चुकीचे आहे. विक्री म्हणजे वाचनसंस्कृती नव्हे. कारण विकत घेतलेली पुस्तके किती वाचली जातात, हा खरा प्रश्‍न आहे. त्याचे उत्तर आपण शोधत गेलो, तर एकूण वाचनसंस्कृती घसरल्याचेच चित्र समाजात पाहायला मिळेल. याला इंग्रजी माध्यमांच्या शाळा कारणीभूत आहेत,'' अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केली. मराठी वाचनाची सवय प्राथमिक शाळेपासून लावली तरच वाचनसंस्कृती वाढेल, असेही ते म्हणाले.

डोंबिवली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून झाल्यानिमित्त काळे यांचा "सकाळ'तर्फे बुधवारी विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. यानिमित्ताने गालिब, ग्रेस, मर्ढेकर यांच्या कवितांपासून वाचनसंस्कृतीपर्यंत, संमेलनातील राजकारणापासून लोकप्रिय संमेलनाध्यक्षांपर्यंतच्या अनेक विषयांवर ही गप्पांची मैफल रंगत गेली.

काळे म्हणाले, 'साहित्य संमेलनात किंवा अन्य ग्रंथसोहळ्यात कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते. या विक्रीवरून वाचनसंस्कृतीचा अंदाज बांधू नये. वाचनसंस्कृती विकसित करायची असेल तर पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तिथे सुसज्ज ग्रंथालये असावीत. त्यामुळे "वाचले पाहिजे', असे वातावरण निर्माण होईल; पण मराठी शाळाच इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आक्रमणात अडकल्या आहेत. असे असताना मराठी शाळांना वाचनसंस्कृतीकडे लक्ष द्या, कसे म्हणायचे, हे प्रश्‍न एकमेकांत अडकले आहेत. ते नीट सोडविले गेले पाहिजेत.''

अध्यक्षीय भाषणाचे सूत्र काय असेल, या प्रश्‍नाचे उत्तर देताना "मला आत्ताच पेपर फोडायचा नाही', अशा मिस्कील शब्दांत टिपण्णी करत काळे म्हणाले, 'अध्यक्ष झाल्यापासून पुष्पगुच्छ आणि शाली गोळा करण्यातच वेळ जात आहे; पण डोक्‍यात भाषण तयार आहे. ते केवळ कागदावर उतरवायचे बाकी राहिले आहे. मराठी संस्कृती घडविण्यात वाङ्‌मयीन संस्कृतीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या विषयाशी संबंधित अध्यक्षीय भाषण असेल.''

... असा विषय मांडणार नाही
'साहित्य संमेलनातील पूर्वीचे वाद हे वाङ्‌मयीन स्वरूपाचे होते. आता ते सामाजिक स्वरूपाचे झाले आहेत. कारण, समाजात संवेदनापेक्षा वेदनेला महत्त्व आले आहे. अशा स्थितीत इतरांचे म्हणणे स्वीकारण्याची ताकद राहत नाही. त्यामुळे संमेलनाला गालबोट लागेल, असा कुठलाही विषय मी अध्यक्षीय भाषणात मांडणार नाही. मराठा आरक्षण, वेगळा विदर्भ, नोटाबंदी अशा संवेदनशील विषयांसाठी हे व्यासपीठ नाही. अध्यक्षीय भाषणातून मी केवळ साहित्य विचारच मांडेन'', अशी स्पष्ट भूमिका डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मांडली.

डॉ. काळे म्हणाले...
- साहित्यिकांनी प्रत्येक विषयावर भूमिका मांडावी, असा आग्रह धरणे चुकीचे
- संमेलनाध्यक्ष लोकप्रियच असावा, असा हव्यास धरला जाऊ नये
- पुण्या-मुंबईच्या बाहेर जाऊन आता ग्रामीण भागात संमेलने व्हावीत
- मी तीन दिवसांचा अध्यक्ष नसेन, कामातून वर्षभर कार्यरत असल्याचे दाखवेन

Web Title: English schlla reading culture decrease