पुणे : आता लकडी पुलावरूनही एंट्री!

ब्रिजमोहन पाटील
बुधवार, 31 जुलै 2019

- पावसाळ्यात मुठा नदीला पुर येऊन भिडे पुल पाण्याखाली गेल्यावर दुचाकीस्वारांची गैरसोय होत असून, वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणत होत आहे.
- भिडे पुलावरून पाणी जात असल्यास व नदी पात्रातील रस्ते बंद झाल्यावर लकडी पुलावरून दुचाकीस्वारांना जाण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे.

 

पुणे : पावसाळ्यात मुठा नदीला पुर येऊन भिडे पुल पाण्याखाली गेल्यावर दुचाकीस्वारांची गैरसोय होत असून, वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणत होत आहे. त्यामुळे भिडे पुलावरू पाणी जात असल्यास व नदी पात्रातील रस्ते बंद झाल्यावर लकडी पुलावरून दुचाकीस्वारांना जाण्यास वाहतूक पोलिसांनी परवानगी दिली आहे.

नारायण पेठ आणि डेक्कन जिमखाना या भागाला जोडण्यासाठी व नदी पात्रातील वाहतूकीसाठी भिडे पुल महत्वाचा आहे. पावसाळ्यात खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडल्यास भिडे पुल पाण्याखाली जातो. तसेच नदी पात्रातील रस्ते बंद होतात. यामुळे डेक्कन, नारायण पेठ, कर्वे रस्ता, लाल बहादूर शास्त्री रस्ता या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. शिवाय लकडी पुलावर दुचाकी घेऊन जाण्यास सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत बंदी आहे.

भिडे पुल बंद झाल्याने दुचाकीस्वारांना मोठा वळसा घालून नदी ओलांडावी लागते. या भागात होणारी वाहतूक कोंडी व दुचाकीस्वारांची गैरसोय वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी नदीला आलेल्या पुरामुळे भिडे पुलासह इतर लहान पुलांवरून पाणी जात असल्यास व नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेल्यास दुचाकीस्वारांनी लकडी पुलाचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत. 

"भिडे पुल व नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली गेल्यास दुचाकीस्वारांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना या काळात लकडी पुल वापरण्याची तात्पुरती मुभा देण्यात आली आहे. काल आणि आजही दुचाकी लकडी पुलावरून सोडल्या आहेत.''ॉ 
- पंकज देशमुख, उपायुक्त, वाहतूक विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entry from the Lakadi bridge now in Pune