सततच्या वातावरण बदलाने पुणेकरांना ताप

Flu
Flu

पुणे - ‘ऑक्‍टोबर हीट’च्या सुरवातीच्या आठवड्यात कमाल तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. ३ ऑक्‍टोबरला आठवड्यातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले, तर दुसऱ्याच दिवशी याच आठवड्यातील सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. चटका लावणारे उन्ह, तर कधी ढगाळ वातावरण आणि कधी-कधी ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसाच्या सरी, अशा वातावरणामुळे पुणेकरांना ‘व्हायरल’ने ‘ताप’ आणला असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडी, असे वातावरण पुणेकर सध्या अनुभवत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, परतीच्या मॉन्सूनदरम्यान पुण्यात काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. त्यानंतर सध्या शहर आणि परिसरात अंशतः ढगाळ वातावरण दिसत आहे. त्या-त्या वेळेपुरता त्या-त्या भागातील कमाल तापमानाचा पारा अंशतः खाली घसरतो. पण, इतर भागात मात्र उन्हाचा चटका कायम असतो, असा अनुभव पुणेकर गेला आठवडाभर घेत आहेत. 

पुण्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरासरी कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस, तर सरासरी किमान तापमान २०.४ अंश सेल्सिअस असते. आठवडाभरात ४ ऑक्‍टोबरचा अपवाद वगळता कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढलेला होता. यातील तफावतदेखील आठ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती, असे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून कमालीचे गरम होत आहे. ऑक्‍टोबरच्या पहिल्या दिवसापासून ‘ऑक्‍टोबर हीट’ सुरू झाली, असा अनुभव सध्या येत आहे. कार्यालयात काम करताना पंख्याशिवाय बसणे शक्‍य होत नाही.
- सागर गोगटे, नागरिक

तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे हवेतील विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण निर्माण होते. त्यातून इन्फ्लूएंझा प्रकारातील विषाणू सक्रिय होतात. तसेच डेंगी, चिकुनगुनिया अशा कीटकजन्य आजारांचे प्रमाणदेखील वाढते.
- डॉ. डी. बी कदम, वैद्यकीय तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com