हवामान बदलाचा "ताप'

हवामान बदलाचा "ताप'
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ; तापमानात चढ-उतार
पुणे - अवघ्या पाच दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 5.1 ते 16.7 असा तब्बल 11.6 अंश सेल्सिअसने वाढला. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा 14.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला. अशा प्रकारे कमी-जास्त होणाऱ्या थंडीमुळे पुणेकर सर्दी, खोकला आणि तापाने "अशक्त' झाले आहेत. या आजारांची लक्षणे असलेले रोज 30 ते 40 रुग्ण क्‍लिनिकमध्ये येत असल्याची माहिती शहरातील वेगवेगळ्या डॉक्‍टरांनी दिली.

पुण्यात यंदा हिवाळा लांबला आहे, त्याचबरोबरच थंडीचे दिवसही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. गेल्या शनिवारी (ता. 9) पुण्यात 5.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. गेल्या 18 वर्षांमधील हे पुण्यातील नीचांकी किमान तापमान होते; पण त्यानंतर पुढील चार दिवस
किमान तापमान सातत्याने वाढत गेले. अवघ्या चार दिवसांमध्ये किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअसने वाढले. शनिवार ते बुधवारपर्यंत (ता. 13) किमान तापमान 5.1 ते 16.7 अंश सेल्सिअसपर्यंत सातत्याने वाढत गेले. पण, त्यानंतर किमान तापमान पुन्हा कमी होऊ लागले आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा 14.6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला होता. वातावरणात अत्यंत कमी वेळेत होणाऱ्या या बदलांमुळे पुणेकर अशक्त झाले आहेत. या बदलांमुळे हवेतील विषाणूंच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होते. या विषाणूंचे संसर्ग प्रमाण यामुळे वाढले आहे. त्यातून थंडी, ताप, सर्दी आणि खोकल्याने बहुतांश पुणेकर आजारी पडल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे.

वातावरणात सकाळी उन्हाचा चटका आणि रात्री थंडी, गार वारे असे वातावरण सध्या आहे. त्यामुळे लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही सर्दी, खोकला, ताप अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाढली आहे.
- डॉ. सचिन गांधी

पहिल्यांदा ढगाळ वातावरण, त्यानंतर वाढलेली थंडीची तीव्रता आणि आता पुन्हा वाढणारे तापमान असे बदल अवघ्या आठवड्यात झाले, त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर होत नाही. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते.
- डॉ. सागर माने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com