#Environment विद्यार्थ्यांची पुस्तकातून पर्यावरणाशी गट्टी

संतोष शाळिग्राम 
शुक्रवार, 12 जुलै 2019

 पर्यावरण हा विषय लहानपणापासूनच मुलांवर बिंबवला, तर पर्यावरण रक्षणाचे बाळकडू त्यांना मिळेल आणि तेच हा विषय पुढील पिढ्यांपर्यंत पोचवतील, असे उद्दिष्ट समोर ठेवून डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीने पहिलीपासून बारावीपर्यंतचा ‘आपले पर्यावरण’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

पुणे - पर्यावरण हा विषय लहानपणापासूनच मुलांवर बिंबवला, तर पर्यावरण रक्षणाचे बाळकडू त्यांना मिळेल आणि तेच हा विषय पुढील पिढ्यांपर्यंत पोचवतील, असे उद्दिष्ट समोर ठेवून डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीने पहिलीपासून बारावीपर्यंतचा ‘आपले पर्यावरण’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे.

अभ्यासक्रम तयार करून ही संस्था थांबली नाही, तर या विषयाचे सविस्तर ज्ञान देणारी चित्रमय पुस्तकेही संस्थेने तयार केली आहेत. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये हा विषय शिकविला जातो. त्याची परीक्षा मात्र ठेवलेली नाही. विद्यार्थ्यांनी स्वतः रस घेऊन हा विषय समजून घ्यावा, हा उद्देश त्यामागे आहे, असे डीईएस स्कूलच्या मुख्याध्यापक ज्योती बोधे यांनी सांगितले. बोधे यांनी हा अभ्यास तयार करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्याबरोबरच अतुल कोठारी सुजाता नायडू, विजय घुगे, सदाचारसिंग तोमर यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यासाठी नवी दिल्लीतील शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाची मदत घेण्यात आली. स्मिता रबडे, ज्योती पोंक्षे, प्रतिभा वडनेरकर, दीपाली क्षीरसागर, प्रशांत जाधव, अवंती बाचीम, ज्योती बोधे, विभावरी देशपांडे यांनी या पुस्तकांचे लेखन केले आहे.  

संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे म्हणाले, ‘‘पर्यावरणाविषयी कुणीच कृतीतून काही करीत नाही; पण सगळ्याच गोष्टी सरकारने कराव्यात, अशी अपेक्षा किती काळ ठेवायची? समाजाला शहाणे करण्याची जबाबदारी ही शिक्षण व्यवस्थेची आहे, हाच विचार करून संस्थेने अभ्यासक्रम तयार केला आहे.’’

काय आहे अभ्यासक्रमात?
पहिली ते तिसरीपर्यंत चित्रमय पद्धतीने पर्यावरणाची मांडणी केली आहे. चौथीपासून पुढे भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला असलेले महत्त्व, तसेच पर्यावरणाचा संबंध योग, संतुलित आहार, माणसाच्या चांगल्या सवयी, आजार, सामाजिक स्वास्थ्य, प्राणी, जैववैविध्य, जलसंचय, नदी, शेती आदींशी जोडण्यात आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रदूषणासारख्या असंख्य बाबींवर पुस्तकांतून प्रकाश टाकला आहे. पृथ्वीवरीलच नव्हे; तर अंतराळातील प्रदूषणही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी सांगितलेले महत्त्व पुस्तकात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Environment friendship students from book