स्वतःला मुलगा नाही म्हणून 'तिने' घेतला पुतण्याचा जीव

संदीप जगदाळे
शुक्रवार, 24 मार्च 2017

शेजारील महिलेच्या दोन महिन्यापूर्वी चोरलेल्या सिमकार्डद्वारे अनिताने माऊलीच्या वडिलांना निवावी फोन करून माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. घरातील मंडळी माऊलीला शोधण्यासाठी जावीत व मृतदेहाची विल्हेवाट लावावी हा अनिताचा हेतू होता...

हडपसर : मुलगा नसल्याच्या असूयेतून चुलतीनेच आपल्या सख्या पाच वर्षांच्या पुतण्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काळेपडळ येथे उघडकीस आली. पुतण्या हरवल्याचा दु:खात खोटे अश्रू गाळणाऱ्या क्रूर महिलेस हडपसर पोलिसांनी 24 तासात अटक केली. 

माणुसकी व नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या या घटनेने हडपसर परिसरात खळबळ उडाली आहे. माऊली विनोद खांडेकर (वय ५, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिता खांडेकर (वय 32, रा. काळेपडळ) हिला अटक करण्यात आली आहे. 

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता हिला चार मुली आहेत. त्यामुळे सासू तिला टोचून बोलत व रागराग करत. तीन भावांमध्ये फक्त धाकट्या जावेलाच माऊली हा एकटाच मुलगा होता. त्यामुळे त्याचा घरात लाड होत तर अनिताच्या मुलींचा लाड होत नसे. या असूया व रागातून थंड डोक्याने तिने माऊलीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातील कॅाटखाली ठेवला, आणि नंतर घरातील मंडळी आणि पोलिस 

मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्याची संधी साधून घरामागील पाण्याच्या ड्रममध्ये तिने मृतदेह टाकला. त्यानंतर माऊली बेपत्ता झाल्याचा बनाव तिने केला. शोधाशोध करूनही माऊली मिळून न आल्याने तो बेपत्ता झाल्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात गुरुवारी कुटुंबीयांनी दिली. कुटुंबीय व पोलिस माऊलीचा शोध घेत होते. 

दरम्यान, शेजारील महिलेच्या दोन महिन्यापूर्वी चोरलेल्या सिमकार्डद्वारे अनिताने माऊलीच्या वडिलांना निवावी फोन करून माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे सांगितले. घरातील मंडळी माऊलीला शोधण्यासाठी जावीत व मृतदेहाची विल्हेवाट लावावी हा अनिताचा हेतू होता. अखेर फोन केलेल्या सिमकार्डच्या धारे पोलिस अनितापर्यंत पोचले. या कार्डवरूनच तिने दीड महिन्यापूर्वी भावालादेखील फोन केल्याचे तपासात उघड झाले, त्यामुळे अनितानेच हा खून केला असावा असा संशय बळावला. त्या आधारे अनिताची चौकशी केली, मात्र अनिता सुरवातीला पोलिसांना दाद देत नव्हती. अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 
पोलिस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलिस निरीक्षक अंजूम बागवान सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, संदीप देशमाने यांच्या पथकाने 24 तासांत खुनाचा तपास केला. 
 

Web Title: envying woman without son killed nephew