पुणे : कात्रज नवीन बोगद्याजवळ कोसळली दरड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कात्रज नवीन बोगद्याजवळ पुणे-सातारा लेनवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उंचावरील दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी या भागात कोणते वाहन नव्हते. त्यामुळे संपूर्ण दरडीचा राडारोडा रस्त्यावर पसरला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ याठिकाणी येऊन वाहतूक थांबवली.

खेड-शिवापूर : कात्रज नवीन बोगद्याजवळ जांभूळवाडीच्या हद्दीत सोमवारी दुपारी दरड कोसळली. सुदैवाने त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. पावसाळा सुरु होऊनही रिलायन्स इन्फ्राने या धोकादायक भागात रस्त्यावर सुरक्षिततेची खबरदारी घेतली नाही. त्यांचा हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जिवावरही बेतला असता. 

कात्रज नवीन बोगद्याजवळ पुणे-सातारा लेनवर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उंचावरील दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने यावेळी या भागात कोणते वाहन नव्हते. त्यामुळे संपूर्ण दरडीचा राडारोडा रस्त्यावर पसरला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पेट्रोलिंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ याठिकाणी येऊन वाहतूक थांबवली. अर्ध्या तासाने रिलायन्स इन्फ्राच्या कर्मचाऱ्यांनी ग्रेडरच्या सहाय्याने हा राडारोडा बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली. 

ज्या ठिकाणहुन दरड कोसळली तो भाग खुप उंचावर आहे. येथील दरडीचा काही भाग खाली कोसळला असून मोठा भाग मोकळा झाला आहे. पावसात हा भाग कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुर्तास याठिकाणी वाहतुकीची एक लेन सुरु ठेवण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कायम एक जेसीबी, एक ग्रेडर आणि एक सुपरवायझर ठेवण्यात येणार असल्याचे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान कात्रज बोगदा परिसरात  डोंगराच्या भागाला सिमेंटचा थर लावण्यात आलेला आहे. मात्र हे काम निकृष्ट पद्धतीचे झाल्याने दरड कोसळण्याचे प्रकार होत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. 

रिलायन्स इन्फ्रा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा 
दरड कोसळल्यानंतरही काही वेळ दरडीच्या कोसललेल्या भागातून काही दगड खाली कोसळत होते. असे असतानाही रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी  एका कामगारास फावड्याच्या सहाय्याने रस्त्यावरील राडारोडा हटविण्यास सांगितले. विशेष म्हणजे या कामगाराच्या डोक्यावर हेल्मेट नसताना तो जीव धोक्यात घालून राडारोडा हटवत होता. याबाबत  'सकाळ' प्रतिनिधीने रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांना विचारणा करताच त्यांनी त्या कामगारास तत्काळ बाजूला केले. त्यानंतर ग्रेडरच्या सहाय्याने राडारोड़ा हटविण्यात आला.                        

Web Title: esakal news sakal news pune news katraj tunnel news