'ई-सकाळ'च्या वाचकांनी दिले 'स्नेहवन'ला बळ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

माझ्या कार्याची दखल ‘ई-सकाळ‘वर घेतली गेली आणि त्यामुळे मला शुभेच्छांच्या बळासह आर्थिक मदतही झाली आहे. त्याबद्दल ‘ई-सकाळ‘च्या वाचकांची कृतज्ञता व्यक्त करतो. यावरून समाजासाठी काही चांगले काम केले तर तुम्हाला जग मदत करते हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झाले आहे.

- अशोक देशमाने

पुणे - ‘आयटी‘तील नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अशोक देशमाने या तरुणाने सुरू केलेल्या ‘स्नेहवन‘ संस्थेबाबत ‘ई-सकाळ‘वर लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ‘ई-सकाळ‘च्या जगभरातील मराठी वाचकांनी "स्नेहवन‘ मदतीचा वर्षाव केला आहे. त्याबद्दल अशोकने ‘ई-सकाळ‘शी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली आहे.

‘आयटीतील नोकरी सोडून तो करतोय समाजसेवा‘ या शीर्षकाखाली "ई-सकाळ‘वर अशोकच्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली होती. मूळ मराठवाड्यातून नोकरीच्या निमित्ताने अशोक पुण्यात आला होता. पण मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची अवस्था पाहून तो अस्वस्थ झाला आणि त्याने आत्महत्याग्रस्त, विस्थापित किंवा उदरनिर्वाहाची भ्रांत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेत "स्नेहवन‘ची स्थापना केली. "माझ्या संस्थेची माहिती "ई-सकाळ‘वर प्रसिद्ध झाल्यानंतर मला वाचकांच्या सदिच्छा तर मिळाल्याच, मात्र प्रत्यक्ष अनोळखी वाचकांनीही माझ्या बॅंक खात्यात आर्थिक मदत जमा केली. वाचकांनी 100 रुपयांपासून मदत केली आहे. वाचकांनी केलेल्या मदतीचा पै न पै माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत मदतीचा आकडा 55 हजारांच्या वर गेला आहे‘, अशी माहिती अशोकने दिली आहे. याशिवाय काही वाचकांनी "स्नेहवन‘ला भेट देण्याची इच्छाही प्रदर्शित केली आहे. तर ‘आयटी‘त नोकरी करणाऱ्या एका तरुणीने तिचा वाढदिवस "स्नेहवन‘मधील विद्यार्थ्यांसोबत साजरा केल्याचेही अशोकने सांगितले. अशोकला केवळ भारतातूनच नव्हे तर ‘ई-सकाळ‘च्या चीन आणि जपानमधील वाचकांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्याचे सांगितले.

Web Title: esakal readres support for Snehwan