‘ईएसआयसी’चा निर्णय; कायमस्वरूपी अपंगत्व आणि मृत कामगाराच्या पत्नीला लाभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

जुन्या प्रकरणांमध्ये जास्त लाभ
ईएसआयसीकडे नोंद झालेल्या सर्वांत जुन्या प्रकरणांतील लाभार्थ्यांना अधिक रक्कम मिळणार आहे. त्या तुलनेत अलीकडील प्रकरणांत फरकाची रक्कम कमी राहील. एखाद्या मयत कामगाराच्या पत्नीने दुसरा विवाह केला असेल, तर तिला अवलंबित्वाचा फायदा (डीबी) मिळणार नाही.

पिंपरी - कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांच्या आणि मृत कामगारांच्या पत्नींना दिल्या जाणाऱ्या अवलंबित्व फायद्याच्या रकमेत वाढ केली आहे. सध्या महामंडळाकडून या दोन्ही प्रकारांमध्ये फरकाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय श्रम मंत्रालयाने ईएसआयसीअंतर्गत नोंदणीकृत कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या कामगारांना (पीडीबी) कायमस्वरूपी अपंगत्व फायदा आणि मृत कामगाराच्या (डीबी) पत्नीला अवलंबित्व फायदा रकमेच्या स्वरूपात दिला जातो. या मंत्रालयाकडून त्यामध्ये वेळोवेळी वाढही केली जाते. चालू वर्षी मंत्रालयाने त्यात वाढ केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून रसायन, मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत

ईएसआयसीच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक डी. जी. घोडके म्हणाले, ‘‘केंद्राने पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय जाहीर केला आहे. १९५२ पासून २०१७ पर्यंतच्या सर्व प्रकारच्या कायमस्वरूपी अपंगत्व आलेले कामगार आणि मृत कामगारांच्या पत्नींना फरकाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित कामगाराचे प्रतिदिनाचे वेतन आणि अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार हा फरक दिला जात आहे. चिंचवड शाखेअंतर्गत पीडीबीची जवळपास एक हजार प्रकरणे असून, शंभर डीबी प्रकरणे आहेत. त्यातील जवळपास ८० टक्के लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यात रकमा जमा करण्यात आल्या आहेत.’’

चिंचवडशिवाय आकुर्डी, पिंपरी आणि भोसरी येथीही ईएसआयसीची कार्यालये सुरू आहेत. कार्यालयांमार्फतदेखील पात्र लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. आकुर्डी शाखेत पीडीबीची सुमारे पाचशे, तर डीबीची जवळपास ८० प्रकरणे आहेत. भोसरीतील दोन्ही कार्यालयांत दोन्ही प्रकारची अंदाजे प्रत्येकी दीड हजार प्रकरणे आहेत.

केंद्र सरकारकडून वाढत्या महागाईनुसार ईएसआयसीकडील नोंदणीकृत अपंग कामगार आणि मृत कामगारांच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या फायद्यावरील रक्कम वाढवून दिली जाते. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना ही वाढीव रक्कम अदा केली जात आहे.
- राजेश सिंग, उपसंचालक, ईएसआयसी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ESIC Decision Permanent disability and benefits to the wife of a deceased worker