'इथेनॉल परवाना आठ दिवसांत देणार'

'इथेनॉल परवाना आठ दिवसांत देणार'

पुणे - ‘‘साखर कारखान्यांना इथेनॉलनिर्मितीचे परवाने देण्यात होणारा विलंब कमी करण्यासाठी तीन दिवसांत मंत्रिगटाची स्थापना करण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. परवाना देण्याच्या सेवेचा ‘सेवा हमी कायद्या’त समावेश करून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून आठ दिवसांच्या आत परवाना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने आयोजित साखर परिषदेच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी कृषिमंत्री शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सदस्य अविनाश महागावकर, संतोष भेंडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘यापुढे फक्त साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉलसारखा पर्याय शोधावा लागेल. ‘इज डुइंग बिझनेस’अंतर्गत इतर व्यवसायांना वेळेत परवाने दिले जातात. असे असताना साखर उद्योगाला आवश्‍यक ते परवाने देण्यात होणारी दिरंगाई योग्य नाही.’’

पवार म्हणाले, ‘अडचणीतील साखर उद्योगांवर सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. स्पर्धा वाढलेली असतानाच साखर उत्पादनासाठीचा खर्चही वाढला आहे. अशा स्थितीत कारखाने टिकणार कसे, तो खर्च कमी कसा करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. साखर आयुक्तालयाने कारखान्यांच्या क्षमतेनुसार कर्मचारी किती असावेत, याचे निकष ठरविले आहेत. त्यानुसार सर्वांनी तारतम्य बाळगायला हवे. उसापासून साखर तयार करण्याऐवजी युरोपियन देशांत बिटापासून साखरनिर्मिती करण्याकडे कल वाढला आहे. बिटाच्या उत्पादनासाठी उसाच्या तुलनेत ४५ टक्केच पाणी लागते. साखरेचा उताराही १३ टक्के मिळत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केंद्र सरकारने निर्यातीसाठी कारखान्यांना मदत केल्यास इथेनॉलनिर्मितीला चालना मिळेल.’’

तशी वेळ आणू नका
‘‘दोन वर्षांपासून साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री साह्यता निधी दिलेला नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना मदत करण्यात अडचणी येत आहेत. तो निधी द्या; अन्यथा परवाना अडवून तो वसूल करण्याची वेळ आणू नका,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कारखानदारांना खडसावले. राज्य सरकारने पाच धरण क्षेत्रांत शंभर टक्के उसाचे पीक हे सूक्ष्म सिंचनावर आणण्याची योजना आणली होती. मात्र, कारखान्यांनी सहकार्य केले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या वेळी राज्य सहकारी बॅंकेकडून पाच कोटी रुपयांचा निधी अनास्कर यांनी मुख्यमंत्री साह्यता निधीला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com