esakal | दुचाकी अपघातानंतरही जपला मराठीचा जाज्वल्य अभिमान
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पंचनामा : दुचाकी अपघातानंतरही जपला मराठीचा जाज्वल्य अभिमान

sakal_logo
By
सु. ल. खुटवड -सकाळ वृत्तसेवा

पुणेरी मराठीचा जाज्वल्य अभिमान म्हणजे काय असतो, हे प्रज्ञाकडून शिकावं. अर्थात कोणी तिच्याकडे शिकवणी नाही लावली तरी अनेकांना ही भाषा ती शिकवतेच. ‘परत इकडे फिरकू नका’ या तक्रार निवारणासाठी सुरु केलेल्या सरकारी विभागात ती नोकरीला आहे. त्यामुळे तिथं कोणी अशुद्ध बोललं तर तिचं डोकंच फिरतं. सगळी कागदपत्रे व्यवस्थित असूनही, फक्त अशुद्ध बोलल्यामुळे अनेकांना ती खेटे मारायला लावते.

‘पुनं’ ‘पानी’ ‘सायेब’, ‘इनंती’ असे शब्द कोणाच्या मुखातून आले की ती तिथेच त्याची शाळा घ्यायची. ‘पुनं’ नव्हे ‘पुणे’, ‘पानी नव्हे पाणी’, ‘सायेब नव्हे साहेब’, ‘इनंती नव्हे विनंती’ असा फरकही ती सांगायची. ‘न. . न नळाचा’ आणि ‘ण. . ण बाणाचा’ हे अक्षर कोठे वापरायचे याच्यातील सूक्ष्म फरकही ती उदाहरणे देऊन सांगत बसायची. अर्थात समोरच्याला यात काडीचंही स्वारस्य नसायचं पण प्रज्ञा फार संयम आणि चिकाटीने आपला मुद्दा पटवून द्यायची. अर्थात या तिच्या वागण्यामुळे अनेकजण तिच्याच तक्रारी करत असत. मात्र,‘परत इकडे फिरकू नका’ या तक्रार विभागाच्या नावाला ती जागत असल्याने वरिष्ठही तिकडे दुर्लक्ष करीत असत.

आज सकाळी ती ऑफिसला निघाली होती. त्यावेळी निसरड्या रस्त्याचा अंदाज न आल्याने तिची दुचाकी हेलकावे खाऊ लागली. चपलांच्या मदतीने तिने अर्जंट ब्रेक मारला पण चप्पल जुनी झाल्याने गाडी जाग्यावर थांबली नाही. त्यामुळे ती घसरून पडली. तरुण मुलगी गाडीवरून पडल्याचे दिसताच अनेक तरुण मुले मदतीसाठी पुढे धावली.

‘‘म्याडम, पावसाच्या पान्यानं डामरी रस्ता वला झालंया. त्यामुळं चिकल हून तुम्ही गसरला.’’ गर्दीतील प्रकाशने प्रज्ञाला माहिती पुरवली. त्यावेळी पायाला वेदना होत असतानाही प्रज्ञा किंचाळली, ‘‘शी! किती अशुद्ध बोलतोस. म्याडम म्हणून तू मला काय मॅड बनवतोस का? ‘मॅडम’ असा शब्द आहे तो. ‘पावसाच्या पान्यानं’ म्हणजे द्विरुक्ती होत नाही का? ‘मुलींची कन्या शाळा’ किंवा ‘पिवळा पितांबर’, ‘गायीचं गोमूत्र’ असं म्हणण्यासारखंच आहे ते. सरळ ‘पावसानं’ म्हण ना. ‘डामरी’ असा कोठं शब्द आहे का? ‘डांबरी’ म्हण. ‘वला’ म्हणजे रे काय? ‘ओला’ म्हण ना. ‘चिकल’ असा शब्द नसून तो ‘चिखल’ आहे तो.

‘हून’ असा शब्द कोठे आढळला. ‘होऊन’ असं म्हणायचंय का? आणि ‘गसरला’ ऐवजी ‘घसरला’ असं म्हणायचं. फक्त एक वाक्य बोलतानाही तू किती घसरला? आता मी तुझं वाक्य शुद्ध करून दिलंय. आता ते पुन्हा म्हणून दाखव.’’ असं म्हणून प्रज्ञाने त्या तरुणाकडून तीन-चार प्रयत्नात ते वाक्य शुद्ध म्हणून घेतलं. प्रज्ञाला दोन-तीन ठिकाणी खरचटलं होतं. त्यामुळे कशीबशी ती रस्त्याच्या शेजारी बसली. ‘‘पानी घ्या.’’ एकानं बाटली तिच्यासमोर धरली. ‘‘अरे ‘पानी’ हा शब्द चुकीचा आहे. ‘पाणी’ म्हणा.’’ मग तिने ‘पानी’ आणि ‘पाणी’ या शब्दातील फरक उच्चारासह करून दाखवला व दोन्हींचा अर्थ समजून सांगितला. तरीही गर्दीतील एकाने पुढाकार घेत, ‘‘चला, मी तुमाला दवाखान्यात सोडतो.’’ असं म्हटलं.

त्यावर प्रज्ञा उखडली. ‘दवाखान्यात सोडतो’ ही काय भाषा झाली? ‘दवाखान्यात घेऊन जातो’ असं म्हणा ना.’’ प्रज्ञानं खरडपट्टी काढल्यावर गर्दी पांगू लागली. ‘‘तुमच्यात कोणी शुद्ध मराठी बोलणारा आहे का? त्याच्याबरोबर मी दवाखान्यात जाईन.’’ पण कोणीही पुढं आलं नाही. मग प्रज्ञा प्रयत्नपूर्वक स्वत:च उठली व गाडी स्टार्ट करून, एकटीच घरी निघाली. शुद्ध मराठीचा जगन्नाथाचा रथ तिला कोणाची मदत मिळो वा न मिळो तिला एकटीला ओढायचा होता.

loading image
go to top