बारामतीत नगरपालिका कर्मचा-यांचे आंदोलन मागे; मात्र कर्मचारी निराशच

मिलिंद संगई
Saturday, 14 November 2020

दिवाळीसाठी नगरपालिका कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी गेले दोन दिवस कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. काल काही कर्मचा-यांनी नगरपालिका इमारतीच्या टेरेसवर जाऊन काळे झेंडेही दाखवले होते त्यानंतर आंदोलन चिघळले होते. 

बारामती : सामंजस्याची भूमिका घेत बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सानुग्रह अनुदान न मिळताही काम बंद आंदोलन मागे घेतले. ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली. 

दिवाळीसाठी नगरपालिका कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी गेले दोन दिवस कर्मचा-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. काल काही कर्मचा-यांनी नगरपालिका इमारतीच्या टेरेसवर जाऊन काळे झेंडेही दाखवले होते त्यानंतर आंदोलन चिघळले होते. 

हे ही वाचा : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे यश; शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले 

दरम्यान, काल या संदर्भात बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव आदींनी कर्मचा-यांची भेट घेत चर्चा केली. सध्या निवडणूकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबत मार्ग काढता येणे शक्य नसल्याने सात डिसेंबरनंतर या संदर्भात चर्चा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे नगरपालिकेच्या वसूलीवर विपरीत परिणाम झाला असून परिणामी नगरपालिका फंडातही पैसे नसल्याने सानुग्रह अनुदान देता येणे अवघड असल्याचेही मत यावेळी त्यांनी बोलून दाखवले. 

हे ही वाचा : पोस्टाकडून घरपोच जीवनपोच जीवन प्रमाणपत्र 

दरम्यान नगरपालिका कर्मचा-यांनी कोरोना काळात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापासून ते दैनंदिन स्वच्छतेपर्यंत सर्व कामे प्रामाणिकपणे केली. बहुसंख्य    कर्मचा-यांनी कोरोनाची पर्वा न करता कामे केली, याची जाणीव ठेवत नगरपालिका कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान मिळावे, या कर्मचा-यांच्या कुटुंबियांचीही दिवाळी आनंदाची व्हावी, अशी कर्मचा-यांची अपेक्षा होती, मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. 

कर्मचारी निराश...

गेल्या काही महिन्यात कोरोनाच्या काळात तसेच गेल्या अनेक वर्षांपासून या शहरासाठी दिलेले योगदान विचारात घेता काहीतरी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून मिळेल या अपेक्षेवर असलेल्या कर्मचा-यांच्या पदरी मात्र निराशाच आली. त्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान मिळालेच नाही. बारामतीकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत आंदोलन मागे घेतले असले तरी कर्मचा-यांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though the employees of Baramati Municipality did not get the sanagraha grant they have withdrawn the strike