दसरा मेळाव्याच्या इव्हेंटमध्ये आम्हाला पडायचे नाही - नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

दसरा मेळावे होत असले तरी देशात आता काही मनोरंजनाचा काळ राहिलेला नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई याचे गंभीर परिणाम होत आहेत.

दसरा मेळाव्याच्या इव्हेंटमध्ये आम्हाला पडायचे नाही - नाना पटोले

पुणे - दसरा मेळावे होत असले तरी देशात आता काही मनोरंजनाचा काळ राहिलेला नाही. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई याचे गंभीर परिणाम होत आहेत. या दसरा मेळाव्यात हे प्रश्‍न संपणार असतील तर ठिक आहे. पण अशा स्थितीत असे इव्हेंट लोकांना, लोकशाहीला मान्य होऊ शकणार नाहीत, त्यामुळे काँग्रेसला कोणत्या पक्षाच्या दसरा मेळाव्याचे काय सुरू आहे या इव्हेंटमध्ये पडायचे नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष शिवसेनेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

शिवदर्शन येथील राजीव गांधील इ लर्निंग शाळेत काँग्रेसतर्फे आयोजित डॉक्टरांच्या मेळाव्यापूर्वी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना दसरा मेळाव्यासंदर्भात विचारले असता पटोले यांनी दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही गटांवर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही नाना पटोले यांना गांभीर्याने घेत नाही अशी टीका केली. त्यावर विचारले असता पटोले म्हणाले, ‘‘भाजपवाले राहुल गांधी यांनाही गांभीर्याने घेत नव्हते, पण राहुल गांधींची पदयात्रा सुरू झाली आणि मोहन भागवत मशिदीत गेले.

तुम्ही आम्हाला सिरियस घेऊ नका, तुम्ही जनतेलाही सिरियस घेत नाहीत. पण देशाचे तीन तेरा वाजले आहेत, त्याचे उत्तर का देत नाहीत?. भाजपला विरोधी पक्ष, लोकशाही मान्य नाही. पण आम्ही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाही तर सरकार म्हणून टीका करत आहोत. त्यांना आमच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यायचे नसेल तर देऊ नये, अशी टीका केली.

राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे असे वाटत होते, पण भाजपच्या लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने टॉर्चर केले. त्यामुळे वनवासात गेले, राहुल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून परत येत आहेत. ही यात्रा एक लोकचळवळ होत असून, महागाई, बेरोजगारी वाढवणारी अत्याचारित व्यवस्था उलथून टाकण्यासाठी पाठिंबा मिळत आहे. तर अहमदाबाद मधून मोदी, शहांचे उलटे दिवस सुरू झाले आहे, अशी टीका पटोले यांनी केली.