'चांगल्या समाजासाठी प्रत्येकाला झटावे लागेल'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - ""आपल्या प्रत्येकाला चांगल्या समाजात राहायचे आहे; पण हा चांगला समाज निर्माण करणार कोण? त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. तरच चांगला समाज तयार होईल,'' असे मत "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. 

पुणे - ""आपल्या प्रत्येकाला चांगल्या समाजात राहायचे आहे; पण हा चांगला समाज निर्माण करणार कोण? त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. तरच चांगला समाज तयार होईल,'' असे मत "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. 

सामाजिक कार्यकर्त्या उषा प्रकाश अकोलकर यांच्या स्मृतिनिमित्त स्नेहसेवा संस्थेतर्फे दिला जाणारा स्नेहसेवा पुरस्कार "बुक गंगा डॉट कॉम'चे संस्थापक मंदार जोगळेकर यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर जोगळेकर यांनी पुरस्काराची रक्कम सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थी सहायक समिती आणि "सकाळ सोशल फाउंडेशन'ला जाहीर केली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अकोलकर, संस्थेचे अध्यक्ष श्‍याम भुर्के, सचिव महेंद्र शेंडे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""कुठल्याही क्षेत्रात काम करताना लोकांच्या गरजांचा शोध घेणे महत्त्वाचे असते. हा शोध घेताना सेवा आणि मेवा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करतानासुद्धा पैसा लागतो. केवळ सेवा करून पोट भरत नाही. अशा व्यक्तींच्या त्यागाची दखल फारशी घेतली गेली नाही. त्यामुळे आर्थिक जबाबदारी सांभाळून व्यावसायिकांनीसुद्धा सामाजिक कामे करावीत. आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना सतत मनात असायला हवी.'' 

जोगळेकर म्हणाले, ""खेडेगावातून पुण्यात शिक्षणासाठी आलो. तेव्हा विद्यार्थी सहायक समितीची ओळख झाली. येथे "कमवा शिका'च्या माध्यमातून शिकता आले. त्यामुळे व्यक्तिमत्त्व बदलत गेले. अनेक चांगले संस्कार झाले. मी आज जो काही आहे, तो कुटुंबीय आणि समितीने केलेल्या संस्कारामुळेच.'' 

समितीत चालणारे व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्यक्रम, कमवा शिका आदी उपक्रमांची माहिती देत जोगळेकर यांनी समितीतील जुन्या दिवसांना उजाळा दिला. शिवाय, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले फार्मर्स ऍप, पंतप्रधानांनी घेतलेली त्याची दखल, "बुकगंगा'ची सुरवात... ही वाटचालही त्यांनी उलगडली. 

दरम्यान, विक्रम शिंदे यांच्या "श्‍वास ओला' या ई- बुकचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते झाले. भुर्के यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनेश पांडे यांनी आभार मानले. 

Web Title: Everyone will have to struggle for a better society